'सनई चौघडे' फेम अभिनेता राज हंचनाळे बाबा झाला, घरी कन्यारत्नाचा जन्म
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राज हंचनाळे यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करून पत्नीच्या आईपणाला सलाम केला आणि मुलीसाठी खास वचन दिले.
मराठी मनोरंजनविश्वातून एक आनंदाची बातमी आली आहे. 'सनई चौघडे' या मालिकेतून ओळखला जाणारा अभिनेता राज हंचनाळे (Raj Hanchanale) बाबा झाला आहे. त्याच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. या नव्या पर्वाची सुरुवात होताना राजने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने पत्नीच्या आईपणाबद्दल आदर व्यक्त केला आहे आणि स्त्रियांच्या सामर्थ्याबद्दल आपले विचारही मांडले आहेत.
पत्नीला प्रसूतीच्या वेळी असह्य वेदनांमधून जाताना पाहण्याचा अनुभव राजने आपल्या पोस्टमध्ये शब्दांत मांडला आहे. आयुष्यात इतके हतबल कधीच वाटले नव्हते, असे त्याने लिहिले. आपल्या सर्वांत जवळच्या व्यक्तीला वेदना सहन करताना पाहूनही तिच्यासाठी काहीच करता येत नाही, ही भावना त्याने बोलून दाखवली. 'देवा, मला तिच्यासाठी काहीतरी करू दे. तिच्या जागी मी हे सगळं सहन करू शकलो असतो तर...' असा विचार मनात येत होता, असे त्याने सांगितले. त्या क्षणी प्रेम करणे आणि प्रेमासाठी वेदना सहन करणे यातला फरक जाणवला, असेही राजने शेअर केले आहे.
स्त्रियांच्या सामर्थ्याबद्दल बोलताना राजने आई होण्याच्या अनुभवाकडे लक्ष वेधले. एखाद्या स्त्रीला आई होताना पाहिल्याशिवाय तिच्या सामर्थ्याची खरी जाणीव होऊ शकते का, असा प्रश्न त्याने विचारला. ज्या वेदनांसमोर आपण असहाय होतो, त्याच वेदनांना सामोरे जाण्याचे धैर्य स्त्री दाखवते आणि एका नव्या जीवाला जगात आणते, असे त्याने म्हटले आहे. पत्नीच्या वेदना वाटून घेता आल्या नाहीत, पण त्या अनुभवाने माझ्यातील माणूस बदलून टाकला, असेही त्याने भावुकपणे लिहिले. पत्नीबद्दलचे प्रेम आणि आदर अनेक पटींनी वाढला असून तिच्या आईपणासमोर नतमस्तक झालो, अशी भावना त्याने व्यक्त केली.
बाबा झाल्यानंतर राजने आपल्या मुलीसाठी एक खास वचनही दिले आहे. मुलीला स्वतःचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी कोणाशीही संघर्ष करावा लागू नये, असे जग घडवण्याचा प्रयत्न करेन, असे त्याने म्हटले. ती कोणापेक्षाही कमी नाही आणि तिच्या स्वातंत्र्याला व आवाजाला स्वतःचे महत्त्व आहे, याची जाणीव तिला करून देईन, असेही त्याने स्पष्ट केले. स्त्रियांना समानतेसाठी लढावे लागण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षाही त्याने पोस्टमधून मांडली आहे.
राजच्या या पोस्टमध्ये फक्त वडील झाल्याचा आनंद नाही. एका नव्या अनुभवातून स्वतःच्या विचारांत झालेला बदलही त्यातून दिसतो. मुलीच्या जन्मामुळे स्त्रियांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नव्याने बदलला, असे त्याने सांगितले. पितृत्वाचा आनंद, पत्नीबद्दलचे प्रेम आणि मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठीची इच्छा या सगळ्या गोष्टी त्याच्या पोस्टमधून व्यक्त झाल्या आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.