मॉडेलिंगपासून मराठी सिनेमापर्यंत: समर खळतकरचे 'मैत्रेया'तून पदार्पण
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्रांती रेडकर वानखेडे दिग्दर्शित 'मैत्रेया' येत्या २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
मनोरंजनविश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी केवळ देखणे व्यक्तिमत्त्व पुरेसे नसते, तर त्याला अभिनयाची जोड आणि काहीतरी वेगळे करण्याची जिद्दही लागते. मॉडेलिंगच्या दुनियेतून पुढे आलेला अभिनेता समर खळतकर आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. क्रांती रेडकर वानखेडे दिग्दर्शित 'मैत्रेया' या चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
समरने सुरुवातीला फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँडसाठी मॉडेलिंग केले. त्यानंतर तो अभिनयाकडे वळला. 'कॅम्पस बीट्स' या लोकप्रिय युवा वेबसीरिजच्या पाचव्या सीझनमध्ये त्याने काम केले आणि त्यामुळे हिंदी मनोरंजनविश्वात त्याची ओळख निर्माण झाली. आता याच अनुभवाची शिदोरी घेऊन तो 'मैत्रेया' या मराठी चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
मॉडेलिंगमुळे कॅमेऱ्यासमोर वावरण्याचा आत्मविश्वास मिळाला, 'कॅम्पस बीट्स'मधून अभिनयाचा अनुभव मिळाला, आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा होती. अशा टप्प्यांतून समरचा प्रवास घडला आहे. हिंदीतील तरुणाईच्या कथांनंतर आता तो मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
'मैत्रेया'मधील त्याची भूमिका मैत्री, प्रेम आणि तरुणाईच्या भावविश्वाशी जोडलेली आहे. त्याचा सहज वावर आणि आकर्षक स्क्रीन प्रेझेन्स या भूमिकेला नवा रंग देणार आहे. अभिनयासोबतच समरचे नृत्यकौशल्यही अप्रतिम आहे. नृत्याची आवड आणि त्यातील कौशल्य यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच झळाळी लाभली आहे. त्यामुळे त्याच्या या मराठी पदार्पणाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
समर म्हणतो, "कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मला 'मैत्रेया'सारखा चित्रपट मिळणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनयाचे विविध पैलू अनुभवता आले आणि माझ्या भूमिकेकडे नव्या दृष्टिकोनातून पाहता आले. क्रांती मॅम यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. 'मैत्रेया'मधील माझे काम प्रेक्षकांना आवडेल आणि त्यांच्या मनात माझ्यासाठी एक खास जागा निर्माण होईल, अशी आशा आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद घेऊन पुढे जाण्याची माझी इच्छा आहे."
लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे यांनी 'मैत्रेया'मधून मैत्री, प्रेम आणि तरुणाईच्या आयुष्यात उमलणाऱ्या नात्यांची गोष्ट मांडली आहे. समरसोबत आयुषी, स्काय आणि रुची हे कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केले आहे. समर टाईम्स प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते मनोज खळतकर असून अमन खळतकर सहनिर्माते आहेत.
मॉडेलिंगपासून वेबविश्व आणि आता मराठी सिनेमापर्यंतचा समरचा हा प्रवास प्रेक्षकांना किती आवडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.