मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

दोन भावांची गोष्ट 'बंधू' २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत, ट्रेलर आला

दोन भावांची गोष्ट 'बंधू' २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत, ट्रेलर आला छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 टीम

उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी भावांच्या भूमिकेत असलेल्या 'बंधू' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

'बंधू' या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत येणार आहे. दोन भावांमधलं प्रेम, भांडणं, रुसवेफुगवे आणि त्याग अशी या नात्याची गोष्ट त्यात मांडली आहे. ट्रेलरमधून या नात्याचे वेगवेगळे भावनिक पैलू दिसतात.

उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी हे दोघं चित्रपटात भावांच्या मुख्य भूमिका करत आहेत. त्यांच्या अभिनयाची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ट्रेलर आल्यानंतर काही तासांतच सोशल मीडियावर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तो ट्रेंडिंगमध्येही आला. चित्रपटात कधी एकमेकांशी भांडणारे, कधी रुसणारे आणि कधी स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करणारे दोन भाऊ दिसतील. कितीही मतभेद झाले किंवा अंतर पडलं, तरी मनात एकमेकांसाठी एक जागा कायम राहते, हे ही कथा सांगते.

रजत बेदी यांनी हा चित्रपट सादर केला आहे. जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने तो तयार झाला. प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी निर्मिती केली आहे. लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांचं आहे. 'आटपाडी नाईट्स' आणि 'सरला एक कोटी' नंतर सुपेकर पुन्हा एकदा माणसांमधल्या नात्यांची गोष्ट घेऊन येत आहेत.

दोन्ही भावांच्या पत्नींच्या भूमिकेत मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे दिसतील. त्यांच्यासोबत रेणुका दफ्तरदार, स्मिता तांबे, श्रीकांत यादव, विठ्ठल काळे, यशपाल सरणात, ज्ञानरत्न अहिवळे, चैतन्य सोलणकर, श्रीपाद पानसे, बालकलाकार शौर्य पाटील, देवा गाडेकर, वर्षा अजित, प्रशांत जाधव, अनिल कांबळे आणि प्रणाली भालेराव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

रजत बेदी म्हणाले, "चांगल्या कथा भाषेच्या सीमा ओलांडून प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचतात. 'बंधू'ची कथा अशीच मनाला स्पर्श करणारी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेमाशी प्रस्तुतकर्ता म्हणून जोडले जाणं माझ्यासाठी एक खास अनुभव आहे. उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी आणि इतर कलाकारांनी आपल्या अभिनयातून या नात्याचं भावविश्व जिवंत केलं आहे. प्रेक्षकांनीही या चित्रपटाला आपलंसं करावं, हीच अपेक्षा आहे."

ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार रामदास आठवले विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी ट्रेलरचं कौतुक केलं आणि चित्रपटाच्या यशासाठी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

गाण्यांचे शब्द गुरू ठाकूर आणि वैभव देशमुख यांचे असून संगीत विजय नारायण गवंडे यांनी दिलं आहे. अजय-अतुल, अमिता घुगरी आणि शमिका भिडे यांनी गाणी गायली आहेत. गाण्यांचे संगीत हक्क झी म्युझिककडे आहेत.

नृत्यदिग्दर्शन अविनाश नलावडे आणि नील राठोड यांनी केलं आहे. वेशभूषा कीर्ती जंगम यांची, तर रंगभूषा समीर रमेश कदम यांची आहे. छायांकन हर्षद आत्माराम गायकवाड यांनी केलं असून अतिरिक्त छायांकन योगेश कोळी यांचं आहे. संकलन वैभव दाभाडे आणि वासिम मुल्ला यांनी केलं, तर साहसदृश्यं बब्बू खन्ना यांनी केली आहेत. या भावनिक कौटुंबिक चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ