रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावण, कुंभकर्ण आणि शूर्पणखेच्या चित्रणावर बोट, पाच गोष्टी खटकल्या
रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या 'रामायण' सिनेमाला थिएटरमध्ये गर्दी आहे आणि कमाईही चांगली आहे. पण रावणाची शिवभक्ती, कुंभकर्णाचा लूक, राण्या, शूर्पणखा आणि CGI यावरून अनेकांना मूळ कथेची भावना हरवल्यासारखी वाटते.
रणबीर कपूर यांचा 'रामायण' सिनेमा प्रदर्शित झाला असून थिएटरमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. सिनेमाने चांगली कमाईही केली आहे. मात्र रामायणासारखा भव्य विषय फक्त तीन तासांच्या सिनेमात मांडणं सोपं नाही. भावना, व्यक्तिरेखेची प्रतिष्ठा आणि पौराणिक काळ मोठ्या पडद्यावर उभा करणं हे खूप अवघड काम आहे.
काही ठिकाणी निर्माते आणि दिग्दर्शक यात यशस्वी झाले आहेत, पण काही ठिकाणी त्यांच्याकडून गंभीर चुका झाल्या आहेत. मूळ कथेच्या आत्म्याशी जोडलेल्या गोष्टीच सिनेमातून गायब झाल्याचं मत मांडलं जात आहे. सिनेमात रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
CGI आणि व्हिज्युअल्सच्या नादात कहाणीच्या महत्त्वाच्या गोष्टी सोडून दिल्यासारखं अनेक ठिकाणी वाटतं. अनेक व्यक्तिरेखांचे चेहरे आणि लूक पाहिले तर टेक्नॉलॉजीचा वापर गरजेपेक्षा जास्त झाल्याचं जाणवतं. काही व्यक्तिरेखा कार्टूनसारख्या वाटतात, तर काहींचे हावभाव आणि संवाद यांचा मेळ बसत नाही.
पहिली खटकणारी गोष्ट म्हणजे रावण. रामायणात रावण फक्त शक्तिशाली राजा आणि खलनायक नाही, तर महादेवाचा निस्सीम भक्त आहे. महादेवाची कठोर तपस्या करणारा आणि समर्पित भावनेने पूजा करणारा राजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सिनेमात ही बाजू आलेलीच नाही. ब्रह्मा आणि विष्णू यांचं दर्शन होतं, पण रावण आणि महादेव यांचा संबंध हवा तसा प्रभावीपणे मांडलेला नाही. महादेवभक्ती ही रावणाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट होती आणि तीच सिनेमातून गायब आहे, ही मोठी चूक असल्याचं म्हटलं जात आहे.
दुसरी गोष्ट कुंभकर्णाची. कुंभकर्णाची भूमिका फैजल मलिक यांनी केली आहे. पण त्याचा लूक गंभीर दिसण्याऐवजी कॉमेडी वाटतो, जणू काही आपण कुंभकर्णाच्या रूपात कार्टूनच पाहतोय असं वाटतं. कुंभकर्ण हे रामायणातलं विशाल आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होतं, ती छाप सिनेमात दिसत नाही. पौराणिक सिनेमात पात्रं जिवंत वाटली पाहिजेत आणि छोटी भूमिका असली तरी तिला न्याय मिळाला पाहिजे, असं म्हटलं आहे.
तिसरी गोष्ट जंगलातली लढाई. राम, सीता आणि लक्ष्मण जंगलात राक्षसांशी लढताना दाखवले आहेत, पण हे दृश्य प्रभावहीन झालं आहे. तिन्ही पात्रं जंगलात पळताना दिसतात आणि त्यांच्या मागे राक्षसांचं सैन्य येताना दिसतं. या अॅक्शन सीनमध्ये वास्तवता जाणवत नाही. राक्षसांचा लूक आणि त्यांच्याशी होणारी लढाई नकली वाटते आणि दृश्य हास्यास्पद झालं आहे. युद्धप्रसंगात भीती आणि रोमांच उभा राहिला पाहिजे, पण इथे CGI ची बनावट दिसते.
चौथी गोष्ट दशरथांच्या राण्यांची. कैकयी वगळता बाकीच्या सगळ्या राण्यांकडे सिनेमात दुर्लक्ष केलं आहे. त्यांच्या वाट्याला महत्त्वाचे संवाद किंवा महत्त्वाच्या भूमिका नाहीत. त्या फक्त पडद्यावर हसताना दिसतात. राजमहालाची भव्यता दाखवण्यासाठीच त्यांना ठेवलंय की काय, असं वाटतं. त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि भावभावना दाखवायला हव्या होत्या, पण त्याकडे दुर्लक्ष झालं.
पाचवी गोष्ट शूर्पणखेची. रकुल प्रीत यांनी ही भूमिका केली आहे. त्यांचा लूक आणि उपस्थिती खटकते. शूर्पणखेला राक्षसीण दाखवण्याऐवजी ग्लॅमरस अंदाजात जास्त दाखवलं आहे. संपूर्ण सिनेमात तिचा राक्षसी अवतार दिसत नाही, ती ग्लॅम डॉलसारखी वाटते. संपूर्ण रामायण जे घडलं त्याला शूर्पणखा कारणीभूत आहे, त्यामुळे तिचं कॅरेक्टर यात अत्यंत महत्त्वाचं आहे. पण ते हवं तसं प्रभावी दाखवलेलं नाही.
एकूणच सिनेमा कमाई करतोय, पण मूळ रामायणाची भावना त्यातून हरवली आहे, असं अनेकांना वाटतंय.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.