साई पल्लवी आता खाकी वर्दीत; 'ओम: चैप्टर 1'मध्ये ती IPS अधिकारी नित्या रेड्डी
रामायणातील सीतेनंतर साई पल्लवी पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत; 'ओम: चैप्टर 1'चा टीझर प्रदर्शित, २० नोव्हेंबर २०२६ ला चित्रपट येणार.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या तिच्या रामायण चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. त्या चित्रपटात ती माता सीतेची भूमिका करत आहे आणि तिच्या या भूमिकेचे सगळीकडे कौतुक होत आहे. पण त्याच वेळी ती आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो म्हणजे बहुप्रतीक्षित 'ओम: चैप्टर 1'.
या चित्रपटाचा टीझर निर्मात्यांनी नुकताच प्रदर्शित केला आहे. त्यात साई पल्लवी IPS अधिकारी नित्या रेड्डीच्या भूमिकेत दिसते. पोलीस अधिकाऱ्याची दमदार भूमिका ती पहिल्यांदाच करत असल्याची झलक यातून समोर आली आहे.
साई पल्लवीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्सने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रत्येक भूमिकेत वेगळेपण जपणारी साई यावेळी पोलीस अधिकारी म्हणून दिसणार आहे. खाकी वर्दीतला तिचा हा नवा अंदाज पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
नव्या टीझरमध्ये नित्या रेड्डी या व्यक्तिरेखेची झलक पाहायला मिळते. तिची देहबोली आणि पडद्यावरील उपस्थिती पाहता, ही भूमिका चित्रपटाच्या कथानकात महत्त्वाची ठरणार असे संकेत मिळतात. मात्र या व्यक्तिरेखेचे कथानकातील नेमके स्थान काय असेल, हे अजून स्पष्ट झालेले नाही. धनुष आणि ममूटी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आहे, पण साईची भूमिका नेमकी काय असेल, याबाबत निर्मात्यांनी अद्याप गुपित कायम ठेवले आहे.
साई पल्लवीच्या चित्रपटातील सहभागाबद्दल बोलताना आरटेक स्टुडिओजच्या निर्मात्या श्रद्धा अग्रवाल म्हणाल्या, "साई पल्लवी एक अप्रतिम अभिनेत्री आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेतून दिसणारा प्रामाणिकपणा आम्हाला नेहमीच भावला आहे. नित्या रेड्डी ही चित्रपटातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे आणि ही भूमिका साकारण्यासाठी साईपेक्षा उत्तम अभिनेत्री आम्हाला मिळूच शकली नसती. साई आमच्या चित्रपटाचा भाग आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. प्रेक्षक तिला या भूमिकेत पाहतील, याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत."
'ओम: चैप्टर 1'चे दिग्दर्शन राजकुमार पेरियासामी करत आहेत. साई पल्लवीसोबत धनुष, ममूटी, श्रीलीला आणि नसीरुद्दीन शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. आरटेक स्टुडिओज आणि वंडरबार फिल्म्स यांची निर्मिती असलेला हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर असल्याचे सांगितले जात आहे.
साई पल्लवीच्या या नव्या व्यक्तिरेखेची झलक समोर आल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा चित्रपट २० नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तोपर्यंत नित्या रेड्डीच्या भूमिकेत साई पल्लवीचा अभिनय पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.