आशिया चषकात भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, 22 नोव्हेंबरला 'ए' संघांचा सामना
रायझिंग स्टार्स आशिया चषक 19 नोव्हेंबरपासून दोहात सुरू होणार असून भारत 'ए' आणि पाकिस्तान 'ए' यांचा गट फेरीचा सामना 22 नोव्हेंबरला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्रिकेटच्या जगात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. एशियन क्रिकेट काउंसिलने (ACC) आशिया चषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात क्रिकेटप्रेमींना भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे. यावेळी दोन्ही देशांची नवी पिढी एकमेकांसमोर उभी राहील.
पुरुषांच्या रायझिंग स्टार्स आशिया चषकाला 19 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. सगळे सामने कतरची राजधानी दोहा येथे खेळवले जातील. स्पर्धेत एकूण आठ संघ भाग घेणार आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांचे 'ए' संघ खेळतील, तर नेपाळ, संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि हाँगकाँग यांचे मुख्य संघ मैदानात उतरतील. स्पर्धेची सुरुवात बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने होईल आणि अंतिम सामना 29 नोव्हेंबरला खेळवला जाईल.
आठ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. 'अ' गटात अफगाणिस्तान 'ए', बांगलादेश 'ए', हाँगकाँग आणि श्रीलंका 'ए' हे संघ ठेवण्यात आले आहेत. 'ब' गटात भारत 'ए', पाकिस्तान 'ए', नेपाळ आणि UAE यांचा समावेश आहे. म्हणजेच भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्यामुळे त्यांची गाठ गट फेरीतच पडणार आहे.
भारत 'ए' आणि पाकिस्तान 'ए' यांच्यातला गट फेरीचा सामना 22 नोव्हेंबरला होणार आहे. भारतीय वेळेनुसार तो दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. भारताचा हा गट फेरीतला दुसरा सामना असेल, कारण भारत त्याआधी 20 नोव्हेंबरला नेपाळविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. पाकिस्तान 'ए' संघही त्याच दिवशी, म्हणजे 20 नोव्हेंबरलाच, UAE विरुद्ध आपला पहिला सामना खेळेल.
गट फेरीनंतर बाद फेरीतही या दोन संघांची गाठ पडू शकते. दोन्ही गटांत पहिल्या स्थानावर राहणारे संघ उपांत्य फेरीत जातील आणि उपांत्य सामने जिंकणारे संघ अंतिम सामना खेळतील. भारत आणि पाकिस्तान आपापल्या गटात अव्वल राहिले, तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. तिथे विजय मिळवला तर अंतिम सामन्यातही ते पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकू शकतात.
या स्पर्धेतला भारताचा रेकॉर्ड थोडा चिंता वाढवणारा आहे. ही स्पर्धा 2013 पासून सुरू झाली असून आतापर्यंत तिचे 7 हंगाम झाले आहेत. त्यात भारताने जेतेपद फक्त एकदाच मिळवले आहे. यावेळी भारतीय संघ दुसरे जेतेपद मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल. बीसीसीआयने मात्र स्पर्धेसाठी भारत 'ए' संघाची अजून घोषणा केलेली नाही.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.