राष्ट्रसंत तुकडोजी महाराज: भजन, ग्रामगीता आणि संघटनेतून नवभारताच्या उभारणीचा विचार
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा आढावा: स्वातंत्र्यलढा, ग्रामविकास, संकटकाळातील मदत आणि विश्वबंधुत्वाचा संदेश.
भारतीय संतपरंपरेने अध्यात्मासोबत समाजप्रबोधन, समता आणि माणुसकीची मूल्ये जपली आहेत. या परंपरेला आधुनिक राष्ट्रनिर्मितीची दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विसाव्या शतकातील एक लोकोत्तर व्यक्तिमत्त्व होते. स्वातंत्र्य मिळवणे हे राष्ट्रनिर्मितीचे शेवटचे ध्येय नाही, तर स्वतंत्र भारताला समताधिष्ठित, स्वावलंबी, एकात्म आणि समृद्ध बनवणे ही खरी जबाबदारी आहे, हे त्यांनी समाजाला पटवून दिले. म्हणूनच त्यांचे काम फक्त संतपरंपरेपुरते राहिले नाही, तर नवभारताच्या उभारणीशी जोडले गेले.
त्यांच्या पुण्यतिथीला अभिवादन करताना, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर समाजाने आणि संत समुदायाने चालणे गरजेचे वाटते. भारताच्या नवनिर्माणासाठी कोणत्याही काळात सज्जनशक्तीने एकत्र येणे आवश्यक आहे.
राष्ट्रसंतांचे राष्ट्रकार्य स्वातंत्र्यानंतर सुरू झाले नव्हते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भजन आणि कीर्तनातून जनजागृती केली. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या काळात त्यांच्या राष्ट्रभक्तिपर रचनांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागवली. चिमूर, आष्टी, यावली या भागांत त्यांच्या शब्दांनी राष्ट्रभक्तीची ठिणगी पेटवली. आते है नाथ हमारे या भजनातील 'झाडझडुले शस्त्र बनेगी! भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेगी, नाव लगेगी किनारे' यांसारख्या स्फूर्तिगीतांनी ग्रामीण भागातील लोकांना आंदोलनाशी जोडले. ब्रिटिश सत्तेने त्यांना अटक केली आणि त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. लोकभाषा, लोकसंगीत आणि गावागावांतील संपर्काची प्रभावी साधने त्यांनी राष्ट्रीय जाणीव जागवण्यासाठी वापरली. त्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकीय सत्तेपासून सुटका नव्हती, तर समाजातील अन्याय, अज्ञान आणि विषमतेपासूनही सुटका होती.
स्वातंत्र्यानंतर भारतासमोर सामाजिक विषमता, धर्माधर्मांतील असंतोष, निरक्षरता, ग्रामीण दारिद्र्य, जातिभेद आणि राष्ट्रीय एकात्मतेची आव्हाने होती. समाजाच्या मनावर प्रभाव टाकणाऱ्या संतांनी राष्ट्रनिर्मितीच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, अशी भूमिका तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मांडली. ही भूमिका देशभर पोहोचवण्याचे ध्येय तुकडोजी महाराजांनी घेतले. राष्ट्रपती भवनातील त्यांच्या खंजिरी भजनाने आणि राष्ट्रभक्तिपर विचारांनी त्यांचे कार्य राष्ट्रीय पातळीवर पोहोचले. संतांचा प्रभाव फक्त धार्मिक श्रद्धेपुरता न राहता लोकशिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि देशसेवेसाठी उपयोगी पडावा, हा त्यांच्या कामाचा गाभा होता.
देशभरातील संतांना राष्ट्रहिताच्या कामासाठी एकत्र आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना १९५६ मध्ये महत्त्वाचे वळण मिळाले. दिल्लीत विविध आखाड्यांतील, राज्यांतील आणि धर्मपीठांतील धर्माचार्य व संतांच्या सहभागातून भारत साधू समाजाची स्थापना झाली. गुरुकुंज आश्रमाच्या जीवनदर्शनविषयक नोंदीनुसार, या संस्थेच्या स्थापनेत राष्ट्रसंतांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांची पहिले अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली.
भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खेड्यांची प्रगती झाल्याशिवाय देशाची सर्वांगीण प्रगती शक्य नाही, अशी त्यांची ठाम धारणा होती. यातूनच त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. ग्रामस्वच्छता, शिक्षण, श्रमप्रतिष्ठा, सहकार, व्यसनमुक्ती, नैतिकता, स्वावलंबन आणि लोकसहभाग यांचा मेळ घालणारा हा ग्रामविकासाचा विचार आहे. 'गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा' ही ओळ त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट करते. ग्रामविकास म्हणजे फक्त रस्ते, पाणी आणि इमारती नाहीत, तर गावातील माणसांचे विचार, वागणे आणि एकमेकांशी असलेले संबंध बदलण्याची प्रक्रिया आहे, असे त्यांच्या कामातून दिसते. १९३५ मध्ये स्थापन केलेल्या गुरुकुंज आश्रमातून त्यांनी समाजसेवा, सामुदायिक प्रार्थना आणि विधायक उपक्रमांना चालना दिली. अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवा मंडळामार्फत ग्रामोन्नतीचा विचार मोठ्या जनसमुदायापर्यंत नेला. गावकऱ्यांनी स्वतःच्या विकासाची जबाबदारी घ्यावी आणि श्रमदानातून सामूहिक प्रगती साधावी, हा त्यांचा महत्त्वाचा संदेश होता.
संकटाच्या वेळी देशबांधवांच्या मदतीला धावून जाणे हेही राष्ट्रनिर्मितीचेच काम आहे. बंगालच्या दुष्काळात, १९६२ मधील चीनच्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, कोयना भूकंपानंतर आणि १९६५ मधील पाकिस्तानच्या आक्रमणाच्या काळात राष्ट्रसंतांनी मदतकार्य आणि जनजागृतीतून राष्ट्रसेवेचा आदर्श घालून दिला. जात, धर्म, पंथ आणि भाषेच्या पलीकडे जाऊन बंधुभाव निर्माण करणे हे त्यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पनेचे मूलभूत सूत्र होते. सामुदायिक प्रार्थनेतून त्यांनी सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचे लोकप्रिय भजन नागपूर विद्यापीठाचे विद्यापीठ गीत आहे.
१९५५ मध्ये जपानमध्ये झालेल्या जागतिक धर्मपरिषदेत आणि विश्वशांतीविषयक परिषदांमध्ये सहभागी होऊन त्यांनी मानवता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देशाबाहेरही पोहोचवला. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाला त्यांनी आपल्या खंजिरीची साथ दिली.
आज विकसित भारताच्या संकल्पनेत ग्रामविकास, नागरिकांचा सहभाग, सामाजिक एकात्मता आणि स्वावलंबन यांना महत्त्व आहे. या मूल्यांचा आग्रह राष्ट्रसंतांनी अनेक दशकांपूर्वी आपल्या कामातून धरला होता. त्यांच्या पुण्यतिथीला स्मरण करताना त्यांचे विचार फक्त गौरवोद्गारांपुरते न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणणे आवश्यक आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.