बसमधील व्हिडिओवरून खासदार बर्वे यांच्याविरोधात काँग्रेस नेतृत्वाकडे तक्रार
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
रामटेकचे खासदार श्याम कुमार बर्वे यांनी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना बसमध्ये चापट मारल्याचा आरोप तक्रारीत आहे; धानोरकर यांनी थट्टामस्करी असल्याचे सांगितले.
काँग्रेसच्या खासदारांच्या वर्तनाबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे गेलेली एक तक्रार सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या दिल्लीतील आंदोलनादरम्यानचा एक व्हिडिओ या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. हा व्हिडिओ काही खासदार बसमधून जात असतानाचा आहे.
काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि के सी वेणुगोपाल यांना ईमेल पाठवला आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सिरीवेला प्रसाद यांनाही हा ईमेल गेला आहे. काँग्रेसच्या 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या 'व्होट बचाव देश बचाव रॅली'च्या दिवशी काही खासदारांचे वर्तन पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे होते, असे या तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीनुसार, अनेक खासदार बसने रामलीला मैदानावरील रॅलीसाठी निघाले होते. त्या वेळी रामटेकचे खासदार श्याम कुमार बर्वे यांनी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना बसमध्ये चापट मारल्याचा आरोप आहे. त्या प्रसंगाचा आणि त्यावरून व्हायरल झालेल्या व्हिडिओचा उल्लेख पत्रात आहे. पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी, संवैधानिक मूल्ये जपण्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी लढत असताना एका खासदाराचे (श्याम कुमार बर्वे) वर्तन पक्षाच्या प्रतिमेला धक्का देणारे आणि जनतेत पक्षाबद्दल चुकीचा संदेश देणारे आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीकडून अशा वर्तनाची अपेक्षा नाही, असे पत्रात म्हटले आहे. संघटनेतील शिस्तीसाठी आणि महिला नेत्यांच्या सन्मानासाठी असे वर्तन मान्य करता येणार नाही, त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी अनुशासनात्मक कारवाई करावी, अशी मागणी त्यात आहे. खर्गे या घटनेची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करतील, असाही उल्लेख पत्रात आहे.
व्हिडिओ सुमारे दहा सेकंदांचा आहे. त्यात बर्वे उभे राहून शेजारी बसलेल्या धानोरकर यांना हलकी चापट मारताना दिसतात. धानोरकर सुरुवातीला कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत, पण नंतर काहीशा रागाने बर्वे यांच्याकडे पाहतात. बसमधील एखाद्या काँग्रेस नेत्याने किंवा पदाधिकाऱ्याने हा व्हिडिओ शूट केला असावा, असे दिसते. तो काँग्रेसच्या वर्तुळात व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करण्यात आली.
या प्रकरणावर प्रतिभा धानोरकर यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेण्यात आली. त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र हा सर्व प्रकार खासदारांमध्ये आपापसात सुरू असलेल्या थट्टामस्करीत झाला असावा, असे त्यांनी सांगितले. आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसश्रेष्ठी यावर काय करतात, याकडे लक्ष लागले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.