बुधवार, 4 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

गोंदियाच्या युथ पार्लमेंटमध्ये 'एक देश, एक निवडणूक'वर विद्यार्थ्यांनी मांडली मते

गोंदियाच्या युथ पार्लमेंटमध्ये 'एक देश, एक निवडणूक'वर विद्यार्थ्यांनी मांडली मते छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

जिल्हास्तरीय युथ पार्लमेंटमध्ये विद्यार्थ्यांनी 'एक देश, एक निवडणूक' संकल्पनेवर चर्चा केली. अंमलबजावणी होताना लोकशाही आणि संविधानिक मूल्ये टिकावीत, असा सूर उमटला.

गोंदिया, दि. 4 : 'एक देश, एक निवडणूक' ही संकल्पना देशासाठी गरजेची आहे, पण ती राबवताना लोकशाही अधिक मजबूत राहिली पाहिजे, सर्व स्तरांतील नागरिकांचे प्रतिनिधित्व टिकले पाहिजे आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण झाले पाहिजे, असा सूर जिल्हास्तरीय युथ पार्लमेंटमध्ये उमटला. जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आपली मते मांडून निवडणूक सुधारणांच्या अनेक बाजूंवर अभ्यासपूर्ण चर्चा केली.

केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या मेरा युवा भारत, गोंदिया यांच्यातर्फे एस. एस. गर्ल्स महाविद्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला, अशी माहिती विभागाचे उपसंचालक सौरभ कुमार निषाद यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी या विषयावर बोलताना सांगितले की, वारंवार होणाऱ्या निवडणुकांमध्ये वेळ, पैसा आणि मनुष्यबळ खर्च होते. ही संकल्पना राबवली तर ते वाचवता येऊ शकते. मात्र ती अमलात आणताना लोकशाहीतील सर्व घटकांचे महत्त्व आणि नागरिकांचे प्रतिनिधित्व कायम राहावे, यासाठी संविधानात आवश्यक त्या सुधारणा नियमानुसार व्हाव्यात, अशी मते त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश शुक्ला उपस्थित होते. युवकांनी आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहावे आणि सतत प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. हवे ते ध्येय गाठेपर्यंत प्रयत्न सोडू नयेत, असेही ते म्हणाले.

प्रमुख पाहुणे म्हणून सालेकसा येथील अग्रवाल महाविद्यालयाचे प्राचार्य एस. नारायण मूर्ती आले होते. विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयाचा सखोल अभ्यास करून आपले मुद्दे प्रभावीपणे मांडा, असे त्यांनी सांगितले. तसेच आपल्या मताधिकाराचे महत्त्व ओळखा, असेही आवाहन त्यांनी केले. एस. एस. गर्ल्स महाविद्यालयाच्या प्राचार्य शारदा महाजन यांनी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या युवक-युवतींचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तरुणांना विचार मांडण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल त्यांनी भारत सरकारच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

या स्पर्धेत जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर, राजीव गांधी सोशल वर्कर कॉलेजच्या श्रीमती संगीता घोष, माजी प्राध्यापिका दीप्ती चौरागडे, कंटेंट क्रिएटर राहुल वर्मा आणि ब्रिजेश गजभिये यांनी परीक्षक म्हणून काम केले.

अंजू कांबळे निमसरकर यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील त्रुटी दाखवून दिल्या. विषयाची मांडणी आणखी प्रभावी करण्यासाठी कोणते मुद्दे घेता येतील, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. प्रा. दीप्ती चौरागडे यांनी 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाची सध्याची स्थिती सांगितली. हे विधेयक लोकसभेच्या संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) विचाराधीन असून त्यावर चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. अशा विधेयकांची सरकारी पातळीवर कशी प्रक्रिया चालते आणि त्यात कोणकोणते टप्पे असतात, याचीही त्यांनी वस्तुनिष्ठ माहिती दिली.

राहुल वर्मा यांनी आपल्या प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. युवकांनी स्वतःतील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य दिशा दिली, तर करिअरच्या नव्या संधी तयार होऊ शकतात, असे ते म्हणाले. संगीता घोष यांनी जिल्हास्तरीय निकाल जाहीर केला. निवड न झालेल्या विद्यार्थ्यांनीही चांगला प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस. एस. गर्ल्स महाविद्यालयाच्या ईश्वरी खटवानी यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन प्रा. राजश्री वाघ यांनी केले, तर प्रा. दिशा गेडाम यांनी आभार मानले. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ