मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

"बंगालचा बदला लोकशाही मार्गाने घेऊ", दिल्लीतल्या INDIA आघाडीच्या रॅलीत ममता बॅनर्जी यांचा इशारा

"बंगालचा बदला लोकशाही मार्गाने घेऊ", दिल्लीतल्या INDIA आघाडीच्या रॅलीत ममता बॅनर्जी यांचा इशारा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

रामलीला मैदानावरच्या रॅलीत ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली. अखिलेश यादव यांनीही भाजपवर निशाणा साधला.

दिल्लीतल्या रामलीला मैदानावर INDIA आघाडीची रॅली झाली. या रॅलीत पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही त्यांनी टीका केली. "बंगालमध्ये आमचा पराभव झालेला नाही, आम्हाला हरवण्यात आलं आहे. याचा बदला लोकशाही मार्गाने घेऊ," असा इशाराही त्यांनी दिला.

ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यासाठी आणि SIR प्रक्रियेचा निषेध करण्यासाठी INDIA आघाडीने ही रॅली आयोजित केली होती. या सभेला देशभरातून विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते.

या वेळी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधल्या SIR प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. या प्रक्रियेमुळे बंगालमधल्या एक कोटीपेक्षा जास्त मतदारांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला गेला, असा दावा त्यांनी केला. बंगालमधली जनता या प्रक्रियेची बळी ठरली आहे, असं त्या म्हणाल्या. "आम्ही शरणागती पत्करणार नाही. प्राण गेला तरी चालेल, पण लोकशाहीसाठी लढा सुरूच ठेवू," अशी भूमिका त्यांनी मांडली. हा लढा आम्ही लोकशाही मार्गाने लढू, असंही त्यांनी सांगितलं.

ममता बॅनर्जी यांच्या भाषणात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती बालकवितेच्या चालीवर केलेल्या टीकेची. "व्हॅनिश व्हॅनिश येस पापा, व्होट चोरी येस पापा, लोकशाही चोरी येस पापा," अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. याशिवाय शेतकऱ्यांचा सन्मान आणि मजुरांची घरं या मुद्द्यांवरूनही त्यांनी भाजपवर आरोप केले.

सभेला आलेल्या लोकांना उद्देशून त्यांनी विचारलं, "बीजेपी पाहिजे का? नो पापा. ज्ञानेश कुमार हवेत का? नो पापा." असं म्हणत त्यांनी उपस्थितांना भाजपला सत्तेतून हटवण्याचं आवाहन केलं.

याच सभेत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही भाजपवर टीका केली. २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष पुन्हा सत्तेत येणार नाहीत, असं विधान त्यांनी केलं.

एकीकडे ममता बॅनर्जी यांनी केलेली कडक टीका आणि दुसरीकडे अखिलेश यादव यांनी २०२७ बद्दल दिलेला इशारा, यामुळे INDIA आघाडीच्या या रॅलीतल्या भाषणांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ