बालगंधर्व रंगमंदिरात एकाच दिवशी सलग सात प्रयोग, 'अलबत्या गलबत्या २.०'ची शिखर विश्वविक्रमात नोंद
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात एकाच संचातील कलाकारांनी सात प्रयोग सादर केले; महापालिका शाळांतील सुमारे साडेसहा हजार विद्यार्थ्यांना विनामूल्य नाटक पाहता आले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
'अलबत्या गलबत्या २.०' या बालनाट्याच्या एकाच संचातील कलाकारांनी एकाच दिवशी सलग सात प्रयोग सादर केले. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात गुरुवारी (ता. १५) सकाळी सातपासून रात्री सव्वाअकरापर्यंत हे प्रयोग रंगले. 'वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया'ने या कामगिरीची 'शिखर विश्वविक्रम' म्हणून नोंद घेतली आणि मराठी रंगभूमीवर नवा इतिहास घडला.
अद्वैत थिएटर निर्मित, रत्नाकर मतकरी लिखित आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित हे बालनाट्य आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, अद्वैत थिएटरचे निर्माते राहुल भंडारे आणि सर्वस्य प्रोडक्शनच्या निर्मात्या श्रद्धा हांडे यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच पुणे महापालिकेच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून या प्रयोगांना सुरुवात झाली. विद्याधर अनास्कर आणि उद्यम विकास बँकेच्या उपाध्यक्षा लीना अनास्कर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दिवसभरात एकूण सात प्रयोग झाले. अखेरचा प्रयोग रात्री पावणेनऊ वाजता सुरू होऊन सव्वाअकरा वाजता संपला. त्यानंतर 'वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया'च्या वतीने संपूर्ण चमूचा प्रेक्षकांसमोर सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, महापालिकेच्या सांस्कृतिक व क्रीडा विभागाचे उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीला शिर्के, सामाजिक कार्यकर्ते अविनाश कांबळे, सुवर्णा थिटे, संदीप विचारे, डॉ. जयंत शेवतेकर, कृष्णा आराणे आदी उपस्थित होते. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी या नाटकात भूमिका करणाऱ्या प्रतिभा मतकरी आणि त्यांच्या कन्या सुप्रिया विनोद यांची उपस्थिती विशेष ठरली.
पहिल्या प्रयोगापासून अखेरच्या प्रयोगापर्यंत कलाकारांनी उत्साह आणि ऊर्जा कायम ठेवली. लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी संपूर्ण चमूचे कौतुक केले. पहिल्या प्रयोगाइतक्याच ऊर्जेने सलग सात प्रयोग करणे ही सर्व रंगकर्मींसाठी अभिमानास्पद कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात महापालिका शाळांतील सुमारे साडेसहा हजार विद्यार्थ्यांना विनामूल्य नाटक पाहण्याची संधी मिळाली. त्यातील अनेकांनी पहिल्यांदाच नाट्यगृहात पाऊल ठेवले. मुलांना रंगभूमीचा आनंद अनुभवता यावा, हा विद्याधर अनास्कर यांचा संकल्प यातून प्रत्यक्षात आला. विद्या बँकेतर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटण्यात आला. बँकेचे कामकाज आणि आर्थिक व्यवहार यांची ओळख व्हावी, म्हणून 'राजू आणि पैशांचे झाड' हे पुस्तकही भेट देण्यात आले.
बालगंधर्व रंगमंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. प्रवेशद्वारावरची रांगोळी, फुग्यांची सजावट, सनईचे सूर आणि नाटकाच्या वाटचालीची माहिती देणारी छायाचित्रे यामुळे उत्सवी वातावरण तयार झाले होते. नाटकातील गमतीजमती, विनोद आणि कलाकारांचा अभिनय पाहून विद्यार्थ्यांनी टाळ्या, शिट्ट्या आणि हास्याच्या गजरात दाद दिली.
नाटकात नीलेश गोपनारायण यांनी चेटकिणीची, सनीभूषण मुणगेकर यांनी अलबत्या गलबत्याची, तर श्रद्धा हांडे यांनी राजकन्येची भूमिका केली. दहा कलाकारांच्या संचाने सात प्रयोगांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सचिन गोस्वामी, संजय नार्वेकर, विजय पाटकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, संकर्षण कऱ्हाडे, स्पृहा जोशी, मकरंद अनास्पुरे, नम्रता संभेराव आदी कलाकारांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. विविध संस्था, संघटना आणि व्यक्तींच्या सहकार्यामुळे उपक्रम यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
सलग सात प्रयोगांच्या या विश्वविक्रमामुळे मराठी बालरंगभूमीच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा नोंदला गेला आहे. आता 'अलबत्या गलबत्या'च्या एक हजाराव्या प्रयोगाची उत्सुकता निर्माण झाली आहे.