मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:59 IST

'शुभं करोति': मुलं आणि पालकांच्या अपेक्षांची गोष्ट सांगणारं नवं नाटक १ ऑक्टोबरपासून

वैभव जोशी लिखित आणि भाग्येश रानडे दिग्दर्शित 'शुभं करोति' हे नाटक १ ऑक्टोबरपासून रंगभूमीवर येत आहे. मुलांची स्वप्नं आणि पालकांच्या अपेक्षा यांच्यातल्या ओढाताणीची गोष्ट यात मांडली आहे.

'शुभं करोति': मुलं आणि पालकांच्या अपेक्षांची गोष्ट सांगणारं नवं नाटक १ ऑक्टोबरपासून
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

घरात प्रेम असतं, काळजी असते, तशीच कधी कधी मतभेदही असतात. मुलांची स्वप्नं आणि पालकांच्या अपेक्षा यांची तारेवरची कसरत जवळपास प्रत्येक घरात कुठे ना कुठे दिसतेच. हीच गोष्ट घेऊन रंगभूमीवर येतंय नवं मराठी नाटक, 'शुभं करोति'. 'नाटकातलं घर नाही... घराघरातलं नाटक...' अशी ओळख सांगत हे नाटक १ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या नाटकाचं लेखन वैभव जोशी यांनी केलं असून दिग्दर्शन भाग्येश रानडे यांचं आहे. ब्ल्यू रॅम्प एन्टरटेन्मेंट, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स आणि सरगम क्रिएशन्स यांची ही निर्मिती असून रावेतकर हे नाटक प्रस्तुत करत आहेत. श्रीरंग खापर्डे, सिद्धार्थ गोखले, नितीन प्रकाश वैद्य आणि राहुल शरद अवस्थी हे नाटकाचे निर्माते आहेत.

कथा एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाभोवती फिरते. स्वतःच्या आयुष्याबद्दल आणि करिअरबद्दल वेगळी स्वप्नं बघणारा एक तरुण मुलगा, त्याच्या निर्णयांकडे पालक ज्या नजरेतून बघतात त्यातून उभे राहणारे प्रश्न आणि अपयश आलं की कुटुंबाकडून मिळणारी साथ, या सगळ्याची भावनिक गुंफण नाटकात बघायला मिळणार आहे. आजच्या पिढीचे विचार आणि पालकांच्या मनातली काळजी, हे दोन्ही पैलू यातून समोर येतात.

कौटुंबिक नात्यांची गोष्ट सांगतानाच अपयशाकडे कसं बघावं, स्वतःला कसं समजून घ्यावं आणि आयुष्यात योग्य मार्ग कसा शोधावा, हा प्रवासही नाटकातून मांडला जातो. रोजच्या बोलण्यात सहज कानावर पडणारे मराठी श्लोक आणि संतसाहित्यातले विचार आधुनिक आयुष्यातल्या प्रश्नांशी जोडत नाटक पुढे सरकतं. त्यामुळे परंपरा आणि आजची पिढी यांच्यातला एक संवादही यात दिसतो.

दिग्दर्शक भाग्येश रानडे सांगतात, ''शुभं करोति ही एका घराची गोष्ट आहे आणि त्याच वेळी अनेक घरांचीही गोष्ट आहे. मुलांची स्वप्नं आणि पालकांच्या अपेक्षा यांचा मेळ घालताना अनेक घरांमध्ये वेगवेगळे प्रश्न तयार होतात. अपयश आलं की आपण स्वतःकडे आणि आपल्या माणसांकडे कसं बघतो, हा या नाटकाचा महत्त्वाचा भाग आहे. श्लोक आणि संतसाहित्यातले विचार आम्ही कुठलाही उपदेश न करता गोष्टीत सहज गुंफले आहेत. प्रेक्षकांना हे बघताना, ही आपल्याच घरातली गोष्ट आहे असं वाटावं अशी आमची इच्छा आहे.''

लेखक वैभव जोशी म्हणतात, ''शुभं करोति लिहिताना मला आजच्या कुटुंबांमध्ये बदलत जाणारी नाती आणि त्यामागच्या भावना मांडायच्या होत्या. मुलांना स्वतःचं आयुष्य घडवायचं असतं, तर पालकांना त्यांच्या भविष्याची काळजी असते. या दोन बाजूंमधला संवाद, त्यातून तयार होणारे प्रसंग आणि शेवटी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न, हा या नाटकाचा गाभा आहे. आजच्या काळातही आपले संस्कार आपल्याला कसे जोडून ठेवतात, हे यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.''

अभिनय बेर्डे, अपूर्वा गोरे, सीमा देशमुख आणि हृषिकेश जोशी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. १ ऑक्टोबरपासून घराघरात घडणारी ही गोष्ट रंगमंचावर येते आहे. आपल्या घरातल्या नात्यांची, स्वप्नांची आणि अपेक्षांची ओळखीची झलक दाखवणारं 'शुभं करोति' प्रेक्षकांना हसवेल, भावेल आणि आपल्या घराकडे नव्या नजरेने बघायलाही भाग पाडेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ