७५ वर्षांच्या वृद्धासोबतचे लग्न फक्त व्ह्युजसाठीचे नाटक, महिला ब्लॉगर रिनाचा खुलासा
औरैया जिल्ह्यातील व्हायरल साखरपुड्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ब्लॉगर रिना राजपूत हिने ते सर्व व्हिडिओ बनावट होते, असे सांगितले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात ७५ वर्षांच्या वृद्धासोबत झालेला साखरपुडा आणि हळदीचे व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर खूप फिरले होते आणि त्यावरून बरीच चर्चा रंगली होती. आता त्या अजब लग्नाच्या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे. संबंधित महिला ब्लॉगर रिना राजपूत हिने स्वतःच पुढे येऊन मोठा खुलासा केला आहे. रामसागर यांच्यासोबतचे ते सर्व व्हिडिओ फक्त लाइक्स आणि व्ह्युज मिळवण्यासाठी रचलेले बनावट नाटक होते, असे तिने सांगितले. प्रत्यक्षात आपण दुसरेच लग्न केले आहे, असेही तिने स्पष्ट केले.
औरैया जिल्ह्यातील अरियारी गावात राहणारे ७५ वर्षांचे रामसागर आणि महिला ब्लॉगर रिना राजपूत यांच्यातील कथित प्रेमाची आणि साखरपुड्याची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. रिना सतत रामसागर यांच्या घरी जात होती, त्यामुळे दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले, असे लोक बोलत होते. रामसागर यांची मुलगी म्हणजेच राधा हिनेही या प्रकरणात काही दावे केले होते. पण रिनाने आता एकापाठोपाठ एक खुलासे करून ते सगळे दावे फेटाळले आहेत. हा सगळा प्रकार फक्त सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवण्याच्या उद्देशाने स्क्रिप्टप्रमाणे शूट केला होता, असे तिने कबूल केले.
रिनाने इन्स्टाग्रामवर एकापाठोपाठ एक अनेक व्हिडिओ शेअर केले. त्यात तिने सांगितले की रामसागर यांच्यासोबतच्या लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिचा खरा पती अनपेक्षितपणे घरी परत आला. त्या घटनेनंतर तिच्या वैवाहिक आयुष्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आणि घरातले वातावरण ढवळून निघाले. याबद्दल बोलताना तिने थेट सवाल केला, "मला लहान मुले आहेत आणि माझा स्वतःचा पती आहे, मग मी ७५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीशी लग्न कसे करू शकते?" आपल्याला जे करायला सांगितले होते, ते आपण फक्त व्हिडिओच्या स्क्रिप्टनुसार केले होते, असे स्पष्टीकरण तिने दिले.
या सर्व वादानंतर रिनाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर खऱ्या पतीसोबतचे काही नवे व्हिडिओही पोस्ट केले आहेत. त्यात दोघे एकमेकांना प्रेमाने हार घालताना दिसतात आणि एक तरुण तिच्या भांगात सिंदूर भरताना दिसतो. या माध्यमातून तिने आपले वैवाहिक आयुष्य आता रुळावर आल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, प्रसिद्धी आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी केलेला हा स्टंट आता तिच्यावरच उलटला, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.