चाकण-हिंजवडीतील कोंडीवर जिल्हाधिकारी डुडी यांच्या टास्क फोर्सची बैठक, कृती आराखडा तयार ठेवण्याचे आदेश
चाकण आणि हिंजवडी औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, खड्डे, पावसाचे पाणी आणि नाल्यांवरील अतिक्रमणे या प्रश्नांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आढावा घेतला.
पुणे : चाकण आणि हिंजवडी औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उच्चस्तरीय टास्क फोर्स समितीच्या माध्यमातून आढावा घेतला. रस्त्यांवरील खड्डे, पावसाच्या पाण्याचा निचरा, नाल्यांवरील अतिक्रमणे, रस्ते रुंदीकरण, जंक्शन, यू-टर्न आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या प्रश्नांवर ठोस उपाय करायचे आहेत. संबंधित यंत्रणांनी सर्वेक्षण, नियोजन आणि आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी आणि त्याचा कृती आराखडा तयार ठेवावा, असे निर्देश डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी आणि समितीच्या सदस्य सचिव ज्योती कदम, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख उपस्थित होते. त्यांच्यासह एमआयडीसी, महापालिका, पोलीस, महामार्ग आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारीही आले होते.
नाले अतिक्रमणमुक्त करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. चाकण परिसरातील नाल्यांचे सर्वेक्षण करून त्यावरील अतिक्रमणांची माहिती गोळा करावी आणि ती हटवण्याची कारवाई करावी, अशी सूचना डुडी यांनी केली. हंगामी अतिक्रमणे तातडीने काढायची आहेत. अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई करून नाले मोकळे करायचे आहेत. परवानगी घेऊन केलेल्या बांधकामांमुळे नाल्याचा प्रवाह अडत असेल, तर नाला दुसऱ्या मार्गाने वळवण्यासाठी लागणाऱ्या जागेचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. एमआयडीसी आणि पीएमआरडीए यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील नाल्यांचे सर्वेक्षण करून अतिक्रमणांची वेगळी माहिती गोळा करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.
राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक, यू-टर्न आणि जंक्शन ठरवताना प्रत्यक्ष वाहतुकीची आकडेवारी, वाहनांची दिशा आणि पुढे वाढणारी वाहतूक यांचा अभ्यास करावा, असे डुडी यांनी सांगितले. ट्रॅफिक सिम्युलेशनच्या आधारे गरज असेल तिथेच अधिकृत यू-टर्न आणि जंक्शन ठरवावेत. रस्त्यांची रचना करताना आजची आणि भविष्यातील वाहतूक क्षमता लक्षात घ्यावी. वाहतूक व्यवस्थापनासाठी आयटीएमएस आणि ट्रॅफिक सिम्युलेशनचा प्रभावी वापर करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.
हिंजवडी आणि चाकण परिसरातील रस्त्यांवरचे खड्डे तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र नुसते खड्डे बुजवून भागणार नाही, रस्त्यांवर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा नीट निचरा होण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे, असे डुडी यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय महामार्ग आणि सर्व्हिस रोडवर बस आणि इतर वाहने अनधिकृतपणे थांबवली जात असल्याने कोंडी होत आहे. त्यामुळे वाहने फक्त अधिकृत बसथांब्यांवर आणि नियोजित बस डेपोमध्येच थांबतील, याची काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले. अनधिकृत थांबे आणि पार्किंगविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले.
एमएनजीएल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित यंत्रणांच्या पाइपलाइनशी जोडलेले प्रश्न तसेच नदी प्रदूषणाचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. संबंधित विभागांनी समन्वयाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सवामुळे थांबवलेली अतिक्रमणविरोधी कारवाई तातडीने पुन्हा सुरू करून आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले.