फोनमधून SIM कार्ड हद्दपार होणार? eSIM नंतर आता iSIM येतंय
फिजिकल SIM कार्डऐवजी eSIM आणि iSIM हे नवीन तंत्रज्ञान येत आहे. जागा, बॅटरी आणि सुरक्षेत काय बदल होणार, ते पाहू.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
आपण कित्येक वर्षांपासून मोबाईलमध्ये ते छोटंसं प्लास्टिकचं SIM कार्ड वापरतोय. कधी ते कापावं लागतं, तर कधी पिनने ट्रे उघडावा लागतो. हा सगळा त्रास आता संपणार आहे, कारण फिजिकल सिम कार्ड हद्दपार होणार असून त्याची जागा eSIM आणि iSIM हे नवीन तंत्रज्ञान घेणार आहे.
याचा परिणाम तुमचा मोबाईल वापरण्याच्या अनुभवावरच होईल. पुढच्या काळात येणारे फोन फक्त SIM-less असणार नाहीत, तर ते आत्तापेक्षा जास्त सुरक्षित आणि फास्ट पण असणार आहेत.
आधी eSIM पाहू. त्याचा अर्थ Embedded SIM. हे तंत्रज्ञान बऱ्याच नवीन फोनमध्ये आलंही आहे. iPhone आणि Samsung च्या महागड्या फोनमध्ये तुम्ही ते पाहिलं असेल. यात वेगळं सिम कार्ड टाकायची गरजच नसते.
फोन बनवतानाच कंपनी मदरबोर्डवर एक छोटीशी चिप लावून देते. नंबर बदलायचा असेल किंवा कंपनी बदलायची असेल, तर फक्त एक QR कोड स्कॅन करायचा आणि काम झालं. दुकानात जाऊन सिम कापायची किंवा बदलायची गरज उरत नाही.
iSIM म्हणजे Integrated SIM. हे eSIM च्या पुढचं पाऊल आणि खूपच आधुनिक तंत्रज्ञान आहे. Qualcomm आणि Thales या मोठ्या कंपन्यांनी त्याची चाचणी केली आहे. यात ती छोटी चिप पण नसते. सिम थेट फोनच्या मुख्य प्रोसेसरमध्येच बसवलेलं असतं, म्हणजे ते प्रोसेसरचाच एक भाग बनून जातं.
दोघांमधला सगळ्यात मोठा फरक जागेचा आहे. eSIM साठी मदरबोर्डवर वेगळी जागा द्यावी लागते. iSIM मात्र प्रोसेसरमध्येच असल्यामुळे अजिबात जागा घेत नाही. त्यामुळे कंपनीला फोन आणखी पातळ बनवता येईल आणि त्यात मोठी बॅटरी टाकता येईल.
दुसरा फरक बॅटरीचा आहे. iSIM हे eSIM पेक्षा खूप कमी बॅटरी खातं, त्यामुळे फोनची बॅटरी जास्त वेळ चालेल.
तिसरा फरक वापराचा. eSIM फक्त फोन आणि स्मार्टवॉचमध्ये वापरता येतं. iSIM खूप छोटं असल्यामुळे भविष्यात ते स्मार्टवॉच, छोटे गॅजेट्स, घड्याळं आणि अगदी लहान IoT डिव्हाईसमध्येही वापरता येईल.
सुरक्षा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आजकाल सिम स्वॅप करून आणि सिम क्लोन करून लोकांचे बँकेचे OTP चोरले जातात. eSIM आणि iSIM डिजिटल असल्यामुळे त्यांचं क्लोनिंग करणं हॅकर्ससाठी जवळपास अशक्य आहे. त्यामुळे तुमचा डेटा जास्त सुरक्षित राहील.
आणखी एक मोठा फायदा फोन चोरीला गेल्यावर दिसतो. चोर सगळ्यात आधी फोनमधलं सिम काढून फेकून देतो, म्हणजे फोन ट्रॅक होणार नाही. पण eSIM आणि iSIM असलेल्या फोनमधून सिम काढताच येत नाही. त्यामुळे फोन नेहमी इंटरनेटला जोडलेला राहील आणि पोलिसांना तो शोधणं खूप सोपं होईल.
थोडक्यात, सिम कार्ड गायब झाल्यामुळे फोन दिसायला सुंदर होईल, बॅटरी जास्त टिकेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॅकर्सपासून जास्त सुरक्षित असेल. पुढच्या एक-दोन वर्षांत सगळेच फोन या नव्या तंत्रज्ञानावर आलेले दिसतील.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.