पनामात ७.६ तीव्रतेचा भूकंप; पनामा सिटीत इमारती हादरल्या, अनेक देशांना त्सुनामीचा इशारा
मध्य अमेरिकेतील पनामात शुक्रवारी सकाळी शक्तिशाली भूकंप झाला. काही इमारतींचे भाग कोसळले असून किनारी देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मध्य अमेरिकेतील पनामा देशात शुक्रवारी सकाळी एकापाठोपाठ एक भूकंपाचे जोरदार धक्के बसले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.६ मोजली गेली. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या अधिकृत माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू पनामाच्या दक्षिण टोकाजवळ, पिटालोसा अरिबाच्या नैऋत्येला अवघ्या १० किलोमीटरवर होता. जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाला. खोली कमी असल्यामुळे धक्के खूपच तीव्र जाणवले आणि पनामा सिटी हादरून गेली.
राजधानी पनामा सिटीत इमारती जोरात डोलू लागल्या, तेव्हा लोक घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर व मोकळ्या जागेत धावले. सोशल मीडियावर या भूकंपाचे अनेक व्हिडिओ झपाट्याने पसरत आहेत. त्यात जमीन हादरताना आणि जुन्या इमारतींचे भाग सुटून खाली पडताना स्पष्ट दिसते. पनामातील पानोनोम या मध्यवर्ती शहरात एका ऐतिहासिक इमारतीचा टॉवर आणि काही निवासी इमारतींच्या बाल्कनी कोसळल्या. प्लाया वेनाओ येथे एक हॉटेल कोसळल्याचा दावा एका सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
भूकंपाची तीव्रता पाहता अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने आणि आंतरराष्ट्रीय यंत्रणांनी गंभीर पावले उचलली. पनामाच्या किनारपट्टीसह दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील अनेक देशांसाठी त्सुनामीचा इशारा जारी झाला. त्यात प्रामुख्याने कोलंबिया, इक्वेडोर, निकाराग्वा आणि ग्वाटेमाला यांचा समावेश आहे. किनारी भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पनामाचे राष्ट्राध्यक्ष होजे राऊल मुलिनो यांनी नागरिकांना घाबरून न जाता संयम ठेवण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावरील संदेशात त्यांनी म्हटले, "या दुर्दैवी घटनेचा वापर समाजात अफवा किंवा अनावश्यक घबराट पसरवण्यासाठी करू नये." मुलिनो यांनी मंत्री मोंटाल्वो यांच्यासोबत पेनोनोमे येथे बाधित भागांचा दौरा केला आणि बाधितांना तातडीने मदत मिळावी यासाठी समन्वय साधत असल्याचे सांगितले. शिक्षण मंत्रालयाने खबरदारी म्हणून शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्कालीन पथके आणि सिनाप्रोकची टीम मदतकार्यात उतरली असून बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
या संकटात लॅटिन अमेरिकेतील मित्र देशांनी पनामाला मदतीचा हात पुढे केला आहे. कोलंबिया, व्हेनेझुएला, मेक्सिको, कोस्टा रिका, ग्वाटेमाला, इक्वेडोर, चिली, डॉमिनिकन रिपब्लिक, पेरू, एल साल्वाडोर आणि होंडुरास यांसारख्या देशांनी पनामा सरकारशी संपर्क साधून मदतीची तयारी दाखवली आहे. मुलिनो यांनी या देशांच्या नेत्यांचे, तसेच अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचे आणि शेकडो महापौर, संघटना व नागरिकांचे पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत.
सरकारकडून बाधित नागरिकांना तात्पुरता निवारा, अन्न आणि वैद्यकीय मदत पुरवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मोठी जीवितहानी टळल्याबद्दल पनामा प्रशासनाला हायसे वाटत असले, तरी त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे किनारपट्टीवर अजूनही सतर्कता ठेवली जात आहे.