बुधवार, 7 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:58 IST

भूतानचे पंतप्रधान तोबगे यांनी मोदींना म्हटले विष्णूचा अवतार; लेखातून मोठ्या भावाचे कौतुक

भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांनी एका लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख भगवान विष्णूचा आधुनिक अवतार असा केला आहे.

भूतानचे पंतप्रधान तोबगे यांनी मोदींना म्हटले विष्णूचा अवतार; लेखातून मोठ्या भावाचे कौतुक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे (Tshering Tobgay) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक खास लेख लिहिला आहे. एका भारतीय वृत्तपत्रात आलेल्या या लेखात त्यांनी मोदींच्या नेतृत्वाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे भरभरून कौतुक केले. मोदींची राजकीय दूरदृष्टी, कल्पकता आणि भारत-भूतान मैत्रीचा उल्लेख करताना तोबगे यांनी त्यांना भगवान विष्णूचा आधुनिक अवतार म्हटले आहे. तोबगे यांनी या विषयावर समाजमाध्यमावरही लिहिले असून, त्यात "To Prime Minister @narendramodi, An avatar of our times" असे म्हटले आहे. ही पोस्ट ७ ऑक्टोबर २०२६ ची आहे.

तोबगे यांनी मोदींच्या नेतृत्वाला शहाणपण, करुणा, धैर्य आणि निःस्वार्थ सेवेचे उत्तम उदाहरण म्हटले आहे. एका देशाच्या प्रमुखाने दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांबद्दल इतका आदर आणि आध्यात्मिक गौरव व्यक्त करणे म्हणजे भारत आणि भूतान यांच्यातील घट्ट सांस्कृतिक आणि धोरणात्मक नात्याची मोठी साक्ष मानली जात आहे.

लेखात तोबगे यांनी २७ जुलै २०१९ रोजी नवी दिल्लीत झालेल्या एका वैयक्तिक आणि भावनिक भेटीची आठवण सांगितली आहे. त्या वेळी भूतानच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला होता. ते संसदेत खासदारही नव्हते आणि त्यांच्याकडे सरकारी पदही नव्हते. एक सामान्य नागरिक म्हणून ते दिल्लीत मोदींना भेटायला आले होते.

तोबगे लिहितात, "माझ्याकडे कोणतेही पद नसतानाही पंतप्रधान मोदींनी मला ज्या आदराने आणि आपुलकीने सांभाळले, ते मी कधीही विसरू शकत नाही. त्यांनी केवळ वयाने मोठे असल्यामुळे नाही, तर खऱ्या अर्थाने एका मोठ्या भावाने आपल्या लहान भावावर दाखवावे तसे प्रेम आणि आपुलकी दाखवली." त्याच भेटीत तोबगे यांच्या तोंडून सहज निघून गेले होते की ते मोदींना विष्णूचा अवतार मानतात. नंतर त्या वाक्यावर विचार केला, तेव्हा त्यांना जाणवले की भारतीय परंपरेत आणि हिमालयातील संस्कृतीत प्रजेचे पालन करणाऱ्या आणि कल्याणकारी राजांना विष्णूचा अंश मानले जाते. त्यामुळे मोदींना विष्णूचा अवतार मानणे पूर्णपणे योग्यच होते, असे त्यांचे म्हणणे आहे.

तोबगे यांनी मोदींच्या गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनच्या प्रवासाकडे बारकाईने पाहिले आहे. १३ वर्षांहून अधिक काळ गुजरातचे नेतृत्व करताना मोदींनी राज्याला विकास, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि सुशासनात देशात आघाडीवर नेले, असे त्यांनी नमूद केले. गुजरातचे तेच यशस्वी मॉडेल आणि तीच दूरदृष्टी मोदींनी २०१४ नंतर संपूर्ण देशात नेली, असेही ते म्हणतात. मोदींची अफाट ऊर्जा, शिस्त आणि लोकसेवेवरची अढळ निष्ठा यांचे त्यांनी कौतुक केले. तोबगे यांच्या मते, मोदींचे सर्वात मोठे यश म्हणजे त्यांनी भारतीय नागरिकांमध्ये स्वतःच्या क्षमतेवर आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यावर अभूतपूर्व विश्वास निर्माण केला. "सबका प्रयास" या घोषणेतून त्यांनी प्रत्येक नागरिकाला देश उभारणीत भागीदार बनवले आहे.

भूतानच्या बौद्ध परंपरेत "रिगसुम गोन्पो" (Rigsum Goenpo) म्हणजे तीन प्रमुख बोधिसत्वांची त्रिमूर्ती अत्यंत पवित्र मानली जाते. त्यात मंजुश्री (ज्ञानाचे प्रतीक), आलोकितेश्वर (करुणेचे प्रतीक) आणि वज्रपाणी (धैर्याचे प्रतीक) यांचा समावेश आहे. तोबगे यांनी या तिन्ही गुणांची सांगड मोदींच्या नेतृत्वाशी घातली आहे. त्यांच्या मते, स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षी म्हणजे २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे मोदींचे स्वप्न हे केवळ राजकीय उद्दिष्ट नाही, तर ज्ञान, करुणा आणि धैर्य यांचा अनोखा संगम आहे. विकसित भारताची ही कल्पना फक्त भारतापुरती नसून, भूतानसारख्या शेजारी देशांच्या समृद्धीसाठी आणि "विकसित भूतान" घडवण्यासाठीही उपयोगी ठरेल, असे ते म्हणतात.

मोदींनी २०१४ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भूतानची निवड केली होती. त्या वेळी त्यांनी B4B म्हणजे "Bharat for Bhutan, Bhutan for Bharat" हा मंत्र दिला होता. या मंत्राची आठवण करून देत तोबगे यांनी सांगितले की, भारत आणि भूतान यांचे संबंध फक्त भौगोलिक किंवा मुत्सद्देगिरीच्या चौकटीत अडकलेले नाहीत, तर ते अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक बंधांवर उभे आहेत. मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार "ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो" (Order of the Druk Gyalpo) देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान मिळवणारे ते पहिले परदेशी राष्ट्रप्रमुख आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ