पॅराग्वेत युनो बँक रात्री अचानक बंद पडली, ३० लाख ग्राहकांचे पैसे अडकले; ठिकठिकाणी निदर्शने
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वेमध्ये युनो बँकेची सेवा मध्यरात्री ठप्प झाली. मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला असून आठ अधिकारी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे देशात एक मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. देशातील आघाडीची बँक मानली जाणारी युनो बँक (Ueno Bank) मध्यरात्री अचानक कोसळली. त्यामुळे देशातील जवळपास निम्मी लोकसंख्या अडचणीत आली असून लोकांची आयुष्यभराची कमाई बँकेत अडकून पडली आहे.
बँक बंद पडल्याचे कळताच लोकांमध्ये मोठी घबराट पसरली. बघता बघता लाखो संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी मुख्य रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. हा राजकीय आणि आर्थिक गोंधळ सांभाळताना सरकारची तारांबळ उडाली आहे.
पॅराग्वेची एकूण लोकसंख्या साधारण ७० लाख आहे. त्यातले ३० लाख लोक एकट्या युनो बँकेचे ग्राहक होते. म्हणजेच देशातील सुमारे ४० टक्के नागरिक आणि ६० टक्क्यांपेक्षा जास्त प्रौढ लोक आर्थिक व्यवहारांसाठी पूर्णपणे या बँकेवर अवलंबून होते. ही बँक सुमारे ८५ कोटी अमेरिकन डॉलर्सच्या (अंदाजे ७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त) सार्वजनिक निधीचे व्यवस्थापन करत होती.
मध्यरात्री बँकेची सेवा अचानक बंद झाल्यामुळे लोकांना आपल्या खात्यातला एक रुपयाही वापरता येत नाहीये. रेशन भरणे, घरभाडे देणे किंवा रोजच्या गरजा भागवणे नागरिकांसाठी अवघड झाले आहे.
या संकटानंतर पॅराग्वेच्या मध्यवर्ती बँकेचे (Central Bank of Paraguay) अध्यक्ष कार्लोस कार्व्हालो यांना तातडीने राजीनामा द्यावा लागला आहे. वाढत्या जनक्षोभाला तोंड देणे सरकारला शक्य नव्हते. शिवाय पोलिसांनी लगेच कारवाई करून युनो बँकेशी संबंधित ८ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बँक अचानक का कोसळली, याबद्दल तपास अहवालांनुसार केवळ तांत्रिक अडचण नव्हे, तर मोठा गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता हे मुख्य कारण आहे. तपास यंत्रणांनी तीन प्रमुख कारणे सांगितली आहेत.
पहिले कारण म्हणजे सॉल्व्हन्सी रेशोमध्ये झालेली मोठी घसरण. नियमानुसार हा रेशो (कर्जफेड क्षमता गुणोत्तर) किमान १२ टक्के असावा लागतो. मात्र मध्यवर्ती बँकेच्या अहवालानुसार युनो बँकेचा रेशो ५.५६ टक्क्यांच्या खाली गेला होता. बँकेतील ठेवी संपल्या होत्या.
दुसरे कारण म्हणजे बेकायदेशीर आणि नियमबाह्य कर्जवाटप. बँकेच्या नियंत्रकांनी आणि अधिकाऱ्यांनी ओळखीच्या संस्थांना आणि राजकीय संबंध असलेल्या लोकांना प्रचंड कर्जे दिली. ती परत न आल्यामुळे बँकेचा ताळेबंद कोलमडला.
तिसरे कारण लिक्विडिटीचे (तरलतेचे) संकट. ग्राहकांना देण्यासाठी बँकेकडे पुरेशी रोख रक्कमच उरली नव्हती, म्हणून मध्यरात्री बँकेची दारे बंद करावी लागली.
बँकेच्या पतनाचे धागेदोरे थेट राष्ट्रपतींपर्यंत जात असल्याचे समोर येत आहे. राष्ट्रपतींच्या जवळच्या दिग्गजांचा यात हात असल्याचा आरोप स्थानिक प्रसारमाध्यमांनी केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून राष्ट्रपतींना पदावरून हटवण्यासाठी महाभियोग (Impeachment) चालवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, सरकारने विशेष ठराव मंजूर करून नागरिकांचे पैसे टप्प्याटप्प्याने परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही रस्त्यावर उतरलेल्या लाखो लोकांचा राग शांत होताना दिसत नाही.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.