ट्रम्प यांच्या ओव्हल ऑफिसमध्ये दिवाळी, विशाल गोंडल यांनी दिली हनुमान चालिसाची प्रत
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये भारतीय वंशाच्या पाहुण्यांसोबत दिवाळी साजरी केली. उद्योजक विशाल गोंडल यांनी त्यांना हनुमान चालिसा भेट दिली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये दिवाळी साजरी केली. अमेरिकेच्या वेळेनुसार शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमाला भारतीय वंशाचे नामांकित उद्योगपती आणि अधिकारी हजर होते.
उपस्थितांमध्ये उद्योजक विशाल गोंडल, मिशेलिन-स्टार शेफ विकास खन्ना आणि कॅनडाच्या माजी खासदार रुबी धल्ला यांच्यासह भारतीय-अमेरिकन समाजातील अनेक प्रभावशाली लोक होते.
या वेळी गोंडल यांनी ट्रम्प यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांना हनुमान चालिसाची एक प्रत भेट दिली. दिवा लावतानाचा आणि ट्रम्प यांच्या हाती चालिसा देतानाचा अनुभव त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. त्या कार्यक्रमाचे फोटो आता जगभर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
गोंडल यांनी पोस्टमध्ये लिहिले, "राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये दिवाळी साजरी करणे हा माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचा क्षण आहे. संत तुलसीदासांनी प्रभू श्रीरामांचे परमभक्त श्री हनुमान यांच्या स्तुतीसाठी रचलेली हनुमान चालिसा ट्रम्प यांना भेट देताना मला अत्यंत अभिमान वाटला. आपल्या देशातील कोट्यवधी नागरिक धैर्य, शक्ती आणि भक्ती मिळवण्यासाठी दररोज याचे पठण करतात."
पारंपरिक दिवे लावताना भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री अधिक घट्ट व्हावी आणि अज्ञानाच्या अंधारावर ज्ञानाच्या प्रकाशाने विजय मिळवावा, अशी प्रार्थना आपण केली, असेही गोंडल यांनी सांगितले. ट्रम्प यांनीही भारतीय समाजाला "जुग जुग जिओ" असा पारंपरिक आशीर्वाद देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
अमेरिकेतील राजकीय विश्लेषकांच्या मते, या सोहळ्याला सांस्कृतिक बरोबरच राजकीय बाजूही आहे. नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकांनंतर ट्रम्प या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. निवडणुकांच्या आकडेवारीनुसार अध्यक्षीय निवडणुकीत भारतीय-अमेरिकन मतदारांच्या मोठ्या गटाने ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा दिला होता. मात्र मध्यावधी निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या मतदारांचा कल डेमोक्रॅटिक पक्षाकडे झुकलेला दिसला. त्यामुळे भारतीय समाजाशी तुटलेला संपर्क पुन्हा जोडण्यासाठी आणि पुढेही राजकीय पाठिंबा टिकवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने हा कार्यक्रम घडवून आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दुसरीकडे, अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांमध्ये सुरक्षेची चिंता कायम आहे. ट्रम्प यांच्या मागा (MAGA, Make America Great Again) मोहिमेतील काही कट्टर समर्थकांच्या विखारी भाषेमुळे आणि उजव्या विचारांच्या तीव्रतेमुळे आशियाई आणि भारतीय वंशाच्या लोकांविरुद्ध वांशिक हिंसाचार वाढल्याचा आरोप अनेक संघटना करत आहेत. गेल्या काही महिन्यांत भारतीय मंदिरांना लक्ष्य करण्याचे आणि द्वेषातून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. अलीकडेच एका हिंदू मंदिरावर गोळीबाराचा प्रयत्न झाला होता, पण बंदुकीची गोळी अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळे ही दिवाळी केवळ औपचारिक कार्यक्रम ठरेल की त्यामुळे भारतीयांविरुद्धचा वांशिक द्वेष खरोखर कमी होईल, असा प्रश्न विचारला जात आहे.
व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा नवी नाही. २००३ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी ती सुरू केली. सुरुवातीला हे कार्यक्रम प्रामुख्याने आयझेनहॉवर एक्झिक्युटिव्ह ऑफिस बिल्डिंगमध्ये व्हायचे आणि त्यात भारतीय-अमेरिकन नागरिक व भारतीय राजनैतिक अधिकारी सहभागी होत. २००९ मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसच्या 'ईस्ट रूम'मध्ये स्वतः पहिला दिवा लावून या परंपरेला नवे आणि भव्य रूप दिले. तेव्हापासून ओव्हल ऑफिस आणि रूझवेल्ट रूमसह व्हाईट हाऊसच्या विविध दालनांमध्ये हा दीपप्रज्वलन सोहळा सतत होत आला आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.