भाडेकरूने भिंती खराब केल्या तर दुरुस्तीचा खर्च कोणाचा? घर सोडताना काय सांगतात नियम
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भिंतींवर खिळ्यांचे खड्डे, पेनचे डाग किंवा खराब रंग मागे ठेवून भाडेकरू घर सोडतात, तेव्हा खर्च कोणी करायचा आणि डिपॉझिटमधून पैसे कापता येतात का, ते जाणून घ्या.
घर भाड्याने दिल्यानंतर ते नीट सांभाळले जावे, अशी प्रत्येक घरमालकाची अपेक्षा असते. पण अनेकदा भाडेकरू घर सोडताना भिंतींवर खिळ्यांचे मोठे खड्डे, डाग, खराब झालेला रंग किंवा इतर नुकसान मागे ठेवून जातात. अशा वेळी दुरुस्तीचा खर्च कोणी करायचा, हा प्रश्न उभा राहतो. घरमालक सिक्युरिटी डिपॉझिटमधून पैसे कापू शकतात का, याचे कायदेशीर नियम समजून घेणे त्यामुळे गरजेचे आहे.
भाडेकरू दीर्घकाळ घरात राहिला असेल, तर काळाच्या ओघात भिंतींचा रंग फिका पडणे किंवा थोडी घाण होणे अगदी स्वाभाविक आहे. कायद्याच्या भाषेत याला 'सामान्य झीज' (Normal Wear and Tear) मानले जाते. अशा परिस्थितीत भिंतींना पुन्हा रंग देण्याचा सगळा खर्च घरमालकालाच, म्हणजेच लँडलॉर्डला करावा लागतो. या खर्चासाठी भाडेकरू जबाबदार नसतो.
पण भाडेकरूने निष्काळजीपणा दाखवून भिंतींवर नको तिथे मोठे ड्रिलिंग केले असेल, भिंती फोडल्या असतील किंवा मुलांनी भिंतींवर पेन आणि पेन्सिलने अक्षरशः चित्रे काढली असतील, तर हा प्रकार 'सामान्य झीज' मध्ये बसत नाही. अशा जादा नुकसानीची भरपाई किंवा दुरुस्तीचा खर्च भाडेकरूला स्वतःच्या खिशातून द्यावा लागतो.
याउलट, जुन्या इमारतीत प्लास्टर आपोआप झडत असेल किंवा भिंतींना आपोआप तडे गेले असतील, तर त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी पूर्णपणे घरमालकाचीच असते.
घर भाड्याने देताना घेतलेली सुरक्षा ठेव म्हणजेच सिक्युरिटी डिपॉझिट (Security Deposit) घर खाली करताना परत करणे बंधनकारक असते. पण भाडेकरूने करारनामा मोडून घराचे किंवा भिंतींचे अवाजवी नुकसान केले असेल, तर घरमालक ठरवून दिलेल्या नियमांनुसार आणि पुराव्यांच्या आधारावर, जसे की रिपेरिंगचे बिल, आवश्यक तेवढा खर्च डिपॉझिटमधून वजा करू शकतात. मात्र मनमानी करून, कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर पैसे कापणे चुकीचे ठरते.
भारतात घरमालक आणि भाडेकरू यांचे संबंध ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, 1882 च्या कलम 108 नुसार ठरतात. त्यातही मुख्यत्वे त्या दोघांमधील कायदेशीर रेंट ॲग्रीमेंटमधील (Rent Agreement) अटींवर सगळे अवलंबून असते.
म्हणूनच वाद टाळण्यासाठी घर भाड्याने घेताना किंवा सोडताना घराची पूर्वस्थिती आणि सध्याची स्थिती दाखवणारे फोटो काढून ठेवणे घरमालक आणि भाडेकरू, दोन्ही बाजूंसाठी फायदेशीर ठरते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.