ओमानच्या किनाऱ्याजवळ पुन्हा व्यापारी जहाजावर हल्ला, एका भारतीय खलाशाचा मृत्यू; भारताकडून तीव्र निषेध
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या 'एमएसव्ही अल जुसुफी' जहाजावर हल्ला झाला. त्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
ओमानच्या किनाऱ्याजवळ एका भारतीय व्यापारी जहाजावर हल्ला झाला असून, त्यात जहाजावर काम करणाऱ्या एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर आणि व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही, अशी स्थिती आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पश्चिम आशियातील बिघडत चाललेल्या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तणाव तात्काळ कमी करावा, असे आवाहनही भारताने केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय ध्वज असलेले 'एमएसव्ही अल जुसुफी' (MSV Al-Jusufi) हे व्यापारी जहाज ओमानमधील लिमाह (Limah) या किनारपट्टीजवळून जात होते. २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी अचानक एका अज्ञात हवाई वस्तूने (Aerial Object) जहाजाला जोरात धडक दिली. या हल्ल्यामुळे जहाजाचे मोठे नुकसान झाले आणि तिथे एकच गोंधळ उडाला. जहाजावर एकूण १४ भारतीय खलाशी आणि कर्मचारी होते.
घटनेची माहिती मिळताच ओमान तटरक्षक दलाने (Oman Coast Guard) तातडीने धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. या दलाने वेळेवर केलेल्या बचावकार्यामुळे जहाजावरील १४ पैकी १३ भारतीयांना सुखरूप बाहेर काढता आले. मात्र हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका भारतीय खलाशाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
मृत खलाशाची ओळख गुजरातमधील गांधार येथील नाहिम अझीझ अशी पटली आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी त्यांच्या मृत्यूला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. सध्या ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी आणि वाचलेल्या खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने कठोर आणि स्पष्ट निवेदन काढले आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याबाबतचे हे निवेदन मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (@MEAIndia) यांच्या खात्यावरून ३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, व्यापारी जहाजांवर वारंवार होणारे असे हल्ले अत्यंत चिंताजनक आणि निंदनीय आहेत. त्यामुळे सागरी सुरक्षेला तर धोका आहेच, शिवाय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मार्गही धोक्यात येत आहेत. पश्चिम आशियातील सध्याचा तणाव तात्काळ थांबवावा आणि सर्व प्रश्न राजनैतिक वाटाघाटींतून सोडवावेत, असे भारताने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर नौकानयनाचे (Navigation) आणि मुक्त व्यापाराचे स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित करणे ही काळाची गरज आहे, असेही भारताने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी ओमानमधील अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.