पश्चिम आशियातील संघर्षात आतापर्यंत 23 भारतीय ठार, त्यात 15 नाविक: परराष्ट्र मंत्रालय
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ओमानजवळ जहाजावरील हल्ल्यात आणखी एका भारतीयाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 23 वर गेली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
पश्चिम आशियातील संघर्षाचा फटका भारतीय नागरिकांनाही बसत आहे. आतापर्यंत या संघर्षात 23 भारतीयांचा मृत्यू झाला असून त्यात 15 भारतीय नाविक आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी मंगळवारी झालेल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जायसवाल यांनी सांगितले की, याआधी या संघर्षात 22 भारतीयांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यात 14 नाविकांचा समावेश होता. आता ओमानजवळ एका जहाजावर झालेल्या हल्ल्यात आणखी एका भारतीयाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 23 वर पोहोचला आहे. त्यातील नाविकांची संख्या 15 झाली आहे.
हा हल्ला दोन नोव्हेंबर रोजी ओमानच्या किनाऱ्याजवळ झाला. या जहाजावर एकूण 14 भारतीय कर्मचारी होते. त्यापैकी 13 जणांना सुरक्षित वाचवण्यात आले, तर एका भारतीयाचा मृत्यू झाला. बचावकार्यासाठी भारताने ओमान सरकारचे आभार मानले आहेत. ओमानच्या लीमाह परिसराजवळ 'एमएसव्ही अल जुसुफी' या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. जहाजावरील एका भारतीयाचा गंभीर दुखापतींमुळे मृत्यू झाला, त्याबद्दल भारताने शोक व्यक्त केला आहे.
हल्ल्यातून वाचलेल्या 13 भारतीयांना लवकरात लवकर मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. मृत भारतीयाचा पार्थिव देह भारतात आणण्याची व्यवस्थाही केली जात आहे. ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेवून असून ओमान सरकारशी समन्वय साधत आहे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
काळ्या समुद्राच्या (Black Sea) क्षेत्रातील व्यावसायिक जहाजांवरील हल्ल्यांबद्दल विचारले असता जायसवाल म्हणाले की, तिथे आतापर्यंत 5 भारतीयांचा मृत्यू झाला आहे आणि 2 भारतीय अद्याप बेपत्ता आहेत. या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरील भारतीय नाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
व्यावसायिक जहाजांवरील हल्ले अत्यंत चिंताजनक असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तणाव तातडीने कमी करावा आणि राजनैतिक चर्चेतून तोडगा काढण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, असे आवाहन भारताने केले आहे. व्यावसायिक जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे थांबवावे, तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सागरी मार्गांवरील वाहतूक आणि व्यापार विनाअडथळा सुरू राहावा, अशीही भारताची मागणी आहे.
या घटनेनंतर भारताने पश्चिम आशियातील सर्व संबंधित पक्षांना संवाद आणि राजनैतिक मार्गाने संघर्ष सोडवण्याचे आवाहन केले आहे. या प्रदेशात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी आणि आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरील जहाजांची सुरक्षित व मुक्त वाहतूक पुन्हा सुरळीत व्हावी, अशी भारताची भूमिका आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.