युरोपातील सुपरमार्केटच्या फ्रिजवर सायबर हल्ला, अन्नसाठा खराब
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बेल्जियम, स्वीडन, लक्झेबर्ग, एस्टोनिया आणि आयर्लंडमधील दुकानांत फ्रिजचे तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने अन्न खराब झाले.
युरोपमधील सुपरमार्केटमध्ये सायबर हल्ल्यांची नवी लाट समोर आली आहे. हॅकर्सनी दुकानांतील फ्रिज आणि फ्रिजर नियंत्रित करणाऱ्या यंत्रणांमध्ये हस्तक्षेप केल्याचा संशय आहे. आजवर आपण बँका, लोकांची खाजगी खाती, मोबाईल आणि अशा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सायबर हल्ला झाल्याचे अनेकदा पाहिले आहे. यावेळी मात्र निशाण्यावर दुकानांतले फ्रिज आले आहेत.
त्यामुळे बेल्जियम, स्वीडन, लक्झेबर्ग, एस्टोनिया आणि आयर्लंड या देशांतील अनेक दुकानांमध्ये शीतकरण यंत्रणा विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी फ्रिजचे तापमान तब्बल ५० अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. त्यामुळे मांस, दुधाचे पदार्थ आणि गोठवलेले अन्न खराब झाले आहे. या घटनेमुळे आधुनिक सुपरमार्केटच्या डिजिटल सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बेल्जियममध्ये Delhaize, Carrefour आणि Spar या सुपरमार्केट साखळ्यांच्या अनेक दुकानांवर परिणाम झाला. Delhaize च्या काही डझन दुकानांतील शीतकरण यंत्रणांमध्ये बिघाड झाला, तर Carrefour च्या सुमारे १५ दुकानांवर परिणाम झाल्याचे वृत्त आहे. स्वीडनमध्ये ICA आणि Coop या साखळ्यांच्या दुकानांतही फ्रिजचे तापमान वाढले. Coop च्या सहा दुकानांत समस्या निर्माण झाल्याची माहिती देण्यात आली.
स्वीडनमधील काही दुकानांत फ्रिज आणि फ्रिजरचे तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. त्यामुळे खराब झालेले अन्न दुकानांतून काढून टाकावे लागले. आयर्लंडमध्ये SuperValu या सुपरमार्केट साखळीच्या १३ दुकानांतील विशिष्ट प्रकारच्या शीतकरण यंत्रणांवर सायबर घटनेचा परिणाम झाला. एस्टोनियामध्येही एका सुपरमार्केटच्या फ्रिजचे तापमान ५० अंशांपर्यंत वाढवण्यात आले.
ऑक्टोबर महिन्यात फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटमध्ये अशाच प्रकारचा सायबर हल्ला झाला होता. हॅकर्सनी इंटरनेटशी जोडलेल्या शीतकरण यंत्रणांवर नियंत्रण मिळवून फ्रिजचे तापमान वाढवले होते. त्या घटनेतही मोठ्या प्रमाणात अन्नसाठा खराब झाला होता. आता युरोपमधील इतर देशांमध्येही अशाच घटना घडल्याने चिंता वाढली आहे.
सुपरमार्केटमधील फ्रिज आणि फ्रिजरचे तापमान नियंत्रित करण्यासाठी इंटरनेटशी जोडलेल्या यंत्रणांचा वापर केला जातो. या यंत्रणांमधील सुरक्षेच्या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स दूरून तापमान बदलू शकतात. काही ठिकाणी फ्रिजची डिफ्रॉस्ट यंत्रणा सुरू करून शीतकरण बंद पाडण्यात आल्याचे समोर आले आहे.
या हल्ल्यांमागे कोण आहे, याची अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. कोणत्याही हॅकर गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. इंटरनेटशी जोडलेल्या रोजच्या वापरातील यंत्रणाही सायबर हल्ल्यांचे लक्ष्य ठरू शकतात, हे या घटनेतून पुन्हा दिसून आले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.