नेहा बोरा यांचा केंद्राला इशारा: दोघांना कोठडीत पाठवून चळवळ थांबणार नाही
जंतरमंतरवर तिरंगा फडकावल्याप्रकरणी सीजेपीच्या दोन प्रवक्त्यांना अटक झाल्यानंतर नेहा बोरा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
"आमच्या चळवळीतील दोघांना कोठडीत पाठवून तुम्ही आमची लढाई बंद करू शकत नाही. आंदोलकांना नजरकैदेत ठेवून आणि त्यांच्यावर कारवाई करूनही ही चळवळ थांबणार नाही. ती अशीच चालू राहील," अशा शब्दांत ऑल इंडिया स्टुडेंट असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी दिल्लीतून केंद्र सरकारला ठणकावून सांगितले.
बुधवारी सकाळी सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना जंतरमंतरवर तिरंगा फडकावल्याप्रकरणी अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ सीजेपी आणि नेहा बोरा यांच्या संघटनेने आज एकत्र पत्रकार परिषद घेतली. तिथे बोलताना नेहा बोरा यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
नेहा बोरा म्हणाल्या, "एसआयआरच्या विरोधात, खुर्चीवरून उतरवण्यासाठी सुरू असलेली ही चळवळ कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही एका व्यक्तीची नाही. ही चळवळ देशातील सर्वसामान्य माणसाची चळवळ आहे. दिल्लीत जंतरमंतरवर, कर्नाटकातील फ्रिडम पार्कमध्ये आणि मुंबईतील आझाद मैदानात ही चळवळ आजही जिवंत आहे."
"सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची कोठडी दिलेली नाही. तर पूर्ण देशाच्या मतदानाच्या अधिकाराच्या आवाजाला तुम्ही कोठडीत पाठवले आहे. ज्यावेळी तुम्ही दिल्लीच्या रस्त्यांवर सर्वसामान्य नागरिकांना फरफटत नेता, तेव्हा तुम्ही फक्त तिथे आंदोलन करणाऱ्या व्यक्तीलाच नाही, तर ज्यांची नावे तुम्ही मतदार यादीतून काढून टाकली आहेत, त्या १३ कोटी लोकांनाही रस्त्यांवर ओढत असता," असे त्यांनी म्हटले.
ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने हरतऱ्हेचे प्रयत्न केले आहेत, असा आरोपही नेहा बोरा यांनी केला. लोकशाही वाचवण्यासाठी लढणाऱ्या तरुणांना रस्त्यांवरून फरफटत नेले गेले, असे त्या म्हणाल्या. ज्ञानेश कुमार हे पंतप्रधानांसाठी एवढे महत्त्वाचे का आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या पत्रकार परिषदेत अभिजीत दिपके यांनीही आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, "२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि इंडिया आघाडी यांच्या विजयात फक्त २ टक्क्यांचा फरक होता. गेल्या दोन वर्षांत १३ कोटींहून अधिक मते डिलीट झाली आहेत. २०२४ च्या मतदार यादीनुसार ही १३ कोटी मते म्हणजे १४ टक्के मते आहेत. ही मतचोरी नाही तर काय आहे?"
अभिजीत दिपके पुढे म्हणाले, "वन नेशन वन इलेक्शन ही घोषणा आहे, पण त्यामागे वन नेशन वन पार्टी हा या सरकारचा उद्देश आहे. हे सर्व फक्त एका पक्षाला जिंकवण्यासाठी सुरू आहे. नरेंद्र मोदी हे हुकुमशाहात रूपांतरित झाले आहेत, पण त्यांच्यात आणीबाणी लावण्याची हिंमत नाही. संपूर्ण देशाने, संपूर्ण जगाने तुमचा खरा चेहरा पाहिला आहे. नरेंद्र मोदी हे एक डरपोक हुकुमशहा आहेत. काल फक्त तिरंगा फडकावला म्हणून या लोकांनी आशुतोष आणि सौरव यांना कोठडीत पाठवले आहे. तिरंगा फडकावणे हा कधीपासून गुन्हा झाला?"