आरोग्यमंत्री आबिटकर १ नोव्हेंबरपासून ५ डिसेंबरपर्यंत राज्यभर फिरणार, सुरुवात नांदेडमधून
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून आरोग्य संवाद यात्रा निघत असून, ती १ नोव्हेंबरला नांदेडहून सुरू होऊन ५ डिसेंबर २०२६ पर्यंत चालणार आहे.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख व्हावी, यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रा आयोजित करण्यात येत आहे. या यात्रेचा शुभारंभ १ नोव्हेंबरला नांदेड येथे आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही यात्रा ५ डिसेंबर २०२६ पर्यंत चालणार आहे.
यात्रेदरम्यान आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यातील आरोग्यसेवांचा आढावा घेऊन त्यातल्या त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. ही यात्रा फक्त आरोग्य योजनांची माहिती देणारी मोहीम नसेल. नागरिकांच्या अनुभवातून आरोग्य व्यवस्थेत कोणत्या सुधारणा कराव्यात, ते ठरवण्याचा प्रयत्न यात आहे.
'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' या अभियानाशी यात्रेची सांगड घातली जाणार आहे. त्यातून सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, पोषण, सांडपाणी व्यवस्थापन, आजारांचे नियंत्रण आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबत जनजागृती होईल. आजार होऊ नयेत यासाठीच्या उपायांमध्ये गावपातळीवरचा सहभाग वाढवण्यावरही भर असेल.
आरोग्य समित्या, लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातला समन्वय वाढवला जाणार आहे. त्यातून आरोग्य सेवांबाबतची उत्तरदायित्वाची जबाबदारी अधिक मजबूत करण्याचा हेतू आहे.
यात्रेत १२५ नवीन संस्थांचे लोकार्पण होणार आहे. याशिवाय जिल्हा एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती, विधानसभा मतदारसंघ समिती, रुग्ण कल्याण समिती, जन आरोग्य समिती किंवा ग्राम आरोग्य, पोषण स्वच्छता समिती यांपैकी एका समितीसोबत बैठक आणि चर्चा होईल. शासकीय आरोग्य संस्थांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला जाईल.
राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत ज्या शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये तपासणी झाली, तिथे भेट देऊन आरोग्यमंत्री त्या योजनेचा आढावा घेतील. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना यांत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांनाही भेट दिली जाईल. तिथे खासगी डॉक्टर आणि रुग्णांशी संवाद साधला जाणार आहे.
गृहभेटींमध्ये पॅलिएटिव्ह केअर, सिकलसेल, संस्थात्मक प्रसूती झालेल्या माता, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया झालेली बालके, क्षयरोग, कुष्ठरोग, जननी सुरक्षा योजनेचे लाभार्थी, कर्करोग तपासणीतील रुग्ण आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतलेले रुग्ण यांच्याशी संवाद साधला जाईल.
आरोग्य योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत किती पोहोचतो, आरोग्य संस्थांमध्ये कोणत्या सुविधा आहेत आणि रुग्णसेवेत कोणत्या अडचणी येतात, याचाही आढावा यात्रेत घेतला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दोन ग्रामीण रुग्णालये यांच्या कामकाजाची वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल. आरोग्य उपकेंद्रांपासून जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये, स्त्री मनोरुग्णालये आणि विशेष रुग्णालये यांच्यापर्यंतच्या सेवांचाही आढावा घेतला जाणार आहे.
नागरिकांच्या गरजा समजून घेणे, आरोग्य सेवांमधल्या त्रुटी ओळखणे आणि मिळालेल्या सूचनांवरून सुधारणा करणे, हा या यात्रेचा उद्देश आहे. या यात्रेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त, संचालक, सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि विविध आरोग्य योजनांचे प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.