शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

नांदेड पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप, पोलीस मुख्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद

नांदेड पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप, पोलीस मुख्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
खेळ PT24 टीम

37 व्या नांदेड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा - 2026 चा समारोप पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर झाला. तीन दिवसांच्या स्पर्धेत पोलीस मुख्यालय, नांदेड संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

नांदेड जिल्हा पोलीस दलाने आयोजित केलेल्या '37 व्या नांदेड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा - 2026' चा समारोप समारंभ 29 ऑक्टोबर 2026 रोजी पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात झाला. स्पर्धा 27 ते 29 ऑक्टोबर अशी तीन दिवस चालली. या स्पर्धेत पोलीस मुख्यालय, नांदेड संघाने उत्कृष्ट कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मनोहर चासकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी भूषवले. व्यासपीठावर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुनील माने, शहरातील सर्व प्रभारी अधिकारी, सर्व शाखा प्रभारी अधिकारी, राखीव पोलीस निरीक्षक, पंच आणि प्रशिक्षक हेही प्रमुख उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी प्रास्ताविकात सांगितले की, पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना रोजच्या तणावपूर्ण कर्तव्यातून थोडा विरंगुळा मिळावा, त्यांचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांच्यातील सांघिक भावना (Team Spirit) वाढावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.

कुलगुरू मनोहर चासकर यांनी खाकी वर्दीतील सुदृढ आणि शिस्तबद्ध खेळाडूंचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, "सामान्य नागरिक जेव्हा शांत झोपतो, तेव्हा पोलीस दलातील प्रत्येक जवान डोळ्यात तेल घालून जिल्ह्याचा पहारा देत असतो. सण-उत्सव, निवडणुका किंवा नैसर्गिक आपत्ती काळात कायदा व सुव्यवस्था राखताना पोलिसांवर मोठा ताण असतो. या 24 तासांच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण कर्तव्यामध्ये स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे खेळ होय."

ते पुढे म्हणाले, "विद्यापीठ ज्ञानाच्या माध्यमातून सुजाण नागरिक घडवते, तर पोलीस दल त्या नागरिकांच्या रक्षणाची ढाल बनते. खेळाच्या मैदानात कोणीही हरत नसतो; एकतर तुम्ही जिंकता किंवा तुम्ही काहीतरी नवीन शिकता!" असा मोलाचा संदेश देऊन त्यांनी सर्व विजेत्या आणि सहभागी खेळाडूंना आगामी परिक्षेत्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेत 40 महिला आणि 100 पुरुष असे एकूण 140 खेळाडू उतरले. त्यांनी हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, कबड्डी आणि खो-खो या 7 सांघिक खेळांबरोबरच अ‍ॅथलेटिक्स, बॉक्सिंग, ज्युडो, कुस्ती, तायक्वांदो, वेटलिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग, पॉवर लिफ्टिंग आणि स्विमिंग या वैयक्तिक प्रकारांतही आपले कौशल्य पणाला लावले.

100 मीटर धावणे (अंतिम निकाल): पुरुष गटात प्रथम क्रमांक मंगेश दळवे (पोलीस मुख्यालय) यांनी मिळवला, तर द्वितीय क्रमांक धनंजय तुपे (जलद प्रतिसाद पथक) यांना मिळाला. महिला गटात प्रथम संतोषी पंदीलवाड (पोलीस मुख्यालय) आणि द्वितीय रोहिणी चारले (पोलीस मुख्यालय) ठरल्या.

सांघिक खेळांचे अंतिम निकाल असे: पुरुषांच्या हॉकीत नांदेड शहर विभाग, फुटबॉलमध्ये पोलीस मुख्यालय, नांदेड, व्हॉलीबॉलमध्ये कंधार विभाग, बास्केटबॉलमध्ये पोलीस मुख्यालय, नांदेड, हँडबॉलमध्ये नांदेड शहर विभाग, कबड्डीत पोलीस मुख्यालय, नांदेड आणि खो-खोत पोलीस मुख्यालय, नांदेड विजेते ठरले. महिलांमध्ये व्हॉलीबॉलमध्ये पोलीस मुख्यालय, नांदेड, बास्केटबॉलमध्ये कंधार विभाग, कबड्डीत पोलीस मुख्यालय, नांदेड आणि खो-खोत पोलीस मुख्यालय, नांदेड हे संघ विजेते राहिले.

#नागपूर#खेल#PT24#Sports#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ