नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral
नागपूर आणि मुंबईदरम्यान धावणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसमध्ये रात्रीच्या प्रवासादरम्यान बाहेरून दगडफेक झाली, दगडाने खिडकीची काच फोडून थेट प्रवाशांच्या दिशेने झेप घेतली, या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका अनपेक्षित घटनेला सामोरं जावं लागलं. रेल्वे नागपूरहून निघून मुंबईच्या मार्गावर धावत असताना रात्रीच्या सुमारास ट्रेनवर बाहेरून कोणीतरी दगडफेक केली. हा दगड इतक्या ताकदीने आला की त्याने डब्याच्या खिडकीची काच फोडली आणि तो डब्यात असलेल्या प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला. या घटनेमुळे नागपूर ते मुंबई या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या हल्ल्याची कोणतीही पूर्वकल्पना नसलेले प्रवासी आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत, प्रवासाचा आनंद घेत होते. अगदी त्याच वेळी हा दगड खिडकीतून आत आला आणि सगळ्यांची एकच धावपळ उडाली. डब्यात अचानक झालेल्या या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे आणि अनेकांपर्यंत पोहोचला आहे.
इन्स्टाग्रामवर @aesthetetraveller या नावाने कंटेंट तयार करणाऱ्या एका ट्रॅव्हलर युजरने हा प्रसंग स्वतः अनुभवला आणि त्याचा व्हिडिओ शेअर केला. या युजरने रेल्वे प्रवास खरंच सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. त्याने सांगितलं की त्या डब्यात त्याच्या आजूबाजूला इतरही कुटुंबं आणि लहान मुलं प्रवास करत होती, त्यामुळे ही घटना आणखी गंभीर मानली जात आहे. दगड खिडकीवर आदळला त्या वेळी थेट प्रवाशाला फार मोठी दुखापत झाली नाही, मात्र त्याच्यासोबत असलेल्या मित्रांना किरकोळ दुखापती झाल्या. रात्रीचं जेवण चालू असतानाच ही घटना घडली आणि खिडकीच्या काचेचा चुरा होऊन त्यात मोठं भोक पडलं. ट्रेनच्या डब्यात अचानक झालेल्या या प्रकाराने प्रवासाचा आनंद घेत असलेल्या सर्वांचीच घाबरगुंडी उडाली.
व्हिडिओच्या शेवटच्या भागात ट्रेनच्या बाहेरचं दृश्य दाखवण्यात आलं आहे, ज्यात पोलीस घटनास्थळाची पाहणी करत असल्याचं दिसतं. व्हिडिओ शेअर करताना या क्रिएटरने आपला अनुभव मांडत रेल्वेतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणला आणि अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना होण्याची गरज व्यक्त केली.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर याबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, ट्रेनच्या खिडक्यांच्या बाहेर डॅशकॅम लावण्याची गरज आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, मुंबई एक्सप्रेसमध्ये त्याच्यासोबतही याआधी अशीच घटना घडली होती. तर आणखी एका युजरने हा प्रवास किती धोकादायक आणि असुरक्षित आहे, अशी प्रतिक्रिया नोंदवली. या सगळ्या प्रतिक्रियांमधून रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या अशा घटनांबाबत प्रवाशांमध्ये असलेली चिंता स्पष्टपणे दिसून येत आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.