नागभिडमध्ये ईव्ही शोरूमच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
स्वस्त दरात इलेक्ट्रिक स्कुटी देण्याचे आमिष दाखवून सुमारे ३०० जणांकडून २ लाख ६६ हजार ९१८ रुपये घेतल्याचा आरोप आहे. नागभिड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागभिड (चंद्रपूर) : स्वस्त दरात इलेक्ट्रिक स्कुटी देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेतल्याच्या आरोपावरून नागभिड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण २ लाख ६६ हजार ९१८ रुपये घेतल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार नागभिडमधील भगतसिंग चौक परिसरात एक शोरूम सुरू करण्यात आले होते. तिथे बुकिंग आणि डाऊन पेमेंटच्या नावाखाली सुमारे ३०० जणांकडून पैसे घेतले गेले. मात्र पैसे देऊनही कोणालाही गाडीची डिलिव्हरी मिळाली नाही. ब्रम्हपुरीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे आलेल्या तक्रारीनंतर चौकशी झाली आणि त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.
गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे अशी : डॉ. अफरोज बशीरखान पठाण (रा. लाखनी, जि. भंडारा), संजय आसाराम कुथे (रा. लक्ष्मीनगर सुलेझरी, ता. नागभिड) आणि विक्रांत नंदकिशोर गजपुरे (रा. भगतसिंग चौक, नागभिड, जि. चंद्रपूर).
फिर्यादी सुरेश गजानन राउत (रा. मौशी, ता. नागभिड) यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता, असे पोलिसांनी सांगितले. त्या तक्रारीनुसार आरोपींनी संगनमत करून १२ जुलै २०२४ ते १२ मार्च २०२५ या काळात भगतसिंग चौक परिसरातील विक्रांत गजपुरे यांचे टिनशेड भाड्याने घेतले. तिथे 'TEHPG PRIVATE LIMITED AND ENTERPRISES, F.Y.R. EV SHOWROOM' या नावाने इलेक्ट्रिक स्कुटी विक्रीचे शोरूम आणि कार्यालय सुरू करण्यात आले.
या शोरूममध्ये आरोपी संजय कुथे आणि विक्रांत गजपुरे यांना मॅनेजर म्हणून ठेवण्यात आले होते. त्यांच्यामार्फत फिर्यादी आणि इतर ग्राहकांना 'F.Y.R. EV' कंपनीची मोपेड स्कुटी स्कीमअंतर्गत स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवण्यात आले. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी गाड्यांच्या बुकिंगसाठी प्रत्येकी १५०० ते २५०० रुपये आणि डाऊन पेमेंटसाठी ७,५०० ते १०,००० रुपये घेण्यात आले. अशा प्रकारे फिर्यादी आणि इतर सुमारे ३०० लोकांकडून मिळून २ लाख ६६ हजार ९१८ रुपये गोळा करण्यात आले.
तक्रारीनुसार पैसे घेऊनही आरोपींनी फिर्यादी आणि इतर साक्षीदारांना एकही इलेक्ट्रिक मोपेड स्कुटी दिली नाही, तसेच स्वीकारलेली रक्कम आणि फायनान्सचे पैसे परस्पर लांबवून आर्थिक फसवणूक केली. चौकशीत नागरिकांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले, असे पोलिसांनी सांगितले.
वरिष्ठांच्या परवानगीने आणि चौकशी अहवालाच्या आधारावर नागभिड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३(५), ३१६(२) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल वेलहाळ डोंगरवार करत आहेत.