मुलमध्ये 'भाऊंचा गरबा' रंगला; मुनगंटीवार यांचे नारीशक्तीच्या सन्मानाचे आवाहन
मूल येथे नवरात्रीनिमित्त झालेल्या दांडिया उत्सवात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्त्रीच्या सन्मानाचा आणि मुलींच्या सुरक्षिततेचा संकल्प करण्यास सांगितले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नवरात्रीचा उत्साह, गरब्याच्या तालावर थिरकणारी पावले आणि संस्कृतीच्या रंगांनी भरलेले वातावरण असा माहोल मूल येथे अनुभवायला मिळाला. स्व. चांगुणाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार सेवा समितीने 'भाऊंचा गरबा' हा दांडिया उत्सव आयोजित केला होता. आमदार सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाला हजर होते.
सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे वाघांच्या भूमीत पहिल्यांदाच आल्या होत्या. मुनगंटीवार यांनी मूलवासीयांच्या वतीने त्यांचे स्वागत केले. नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देताना त्यांनी हा देखणा सोहळा उत्तम पद्धतीने आयोजित केल्याबद्दल आयोजकांचेही अभिनंदन केले. मूलवासीयांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि मनातले समाधान पाहून आनंद वाटतो, असे ते म्हणाले.
मुनगंटीवार यांनी सांगितले की, मूल ही थोर माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांची भूमी आहे आणि तिला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. भारत-चीन युद्धाच्या काळात देशासाठी सुवर्णदान करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अभिमानास्पद आहे. देशाप्रती समर्पणाची भावना, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक परंपरांचा सन्मान ही या भूमीची ओळख आहे, असेही त्यांनी नमूद केले.
नवरात्रोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नाही, असे सांगून ते म्हणाले की शक्तीची उपासना करण्यासोबत नारीशक्तीचा सन्मान करण्याची प्रेरणा देणारा हा पवित्र काळ आहे. स्त्रीच्या सन्मानातूनच कुटुंब, समाज आणि राष्ट्राची प्रगती होते. म्हणून या नवरात्रोत्सवात प्रत्येकाने नारी सन्मानाचा संकल्प करावा आणि प्रत्येक मुलीला सुरक्षित वातावरण द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. महिलांना सन्मान आणि समान संधी देणे ही काळाची गरज आहे. हा सन्मान फक्त शब्दांपुरता न राहता कृतीतूनही दिसला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
या उत्सवामुळे मूलच्या सांस्कृतिक परंपरेला नवी झळाळी मिळाली. गरब्याचा उत्साह, नवरात्रोत्सवाचा आनंद आणि नारीशक्तीच्या सन्मानाचा संदेश यांचा सुंदर संगम या सोहळ्यात दिसला.
प्रार्थना बेहेरे यांनी मूल येथे येण्याची आणि सर्वांना भेटण्याची संधी दिल्याबद्दल सुधीरभाऊंचे आभार मानले. मूलमध्ये येण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. भाऊंच्या घरी गेल्यावर त्यांनी अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने स्वागत केले, असे त्या म्हणाल्या. त्यांना विविध विषयांचे सखोल ज्ञान आहे आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असेही त्यांनी सांगितले.
आजच्या काळात मुलींनी निर्भयपणे घराबाहेर पडून आत्मविश्वासाने आपल्या स्वप्नांकडे वाटचाल केली पाहिजे, असे मत बेहेरे यांनी मांडले. मुलींची सुरक्षितता ही एकट्या व्यक्तीची नाही, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. मुलींना सुरक्षित वातावरण देणे आणि त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे त्या म्हणाल्या.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.