व्हिक्टोरिसला एक वर्ष पूर्ण, 22,990 रुपयांत मिळणार 'ऑरम' अॅक्सेसरी किट
मारुती सुझुकीने मिड-साइज एसयूव्ही विक्टोरिसला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने ऑरम एडिशन आणले आहे. ही नवी गाडी नाही, तर फक्त स्ट्रॉन्ग-हायब्रिड व्हेरियंट्ससाठी असलेले अॅक्सेसरी किट आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मारुती सुझुकीच्या मिड-साइज एसयूव्ही व्हिक्टोरिसला भारतात येऊन एक वर्ष झालं. त्याचं निमित्त साधून कंपनीनं 'ऑरम एडिशन' बाजारात आणलं आहे. पण इथे एक गोष्ट नीट समजून घ्यायला हवी. ही कोणती नवी गाडी किंवा नवं मॉडेल नाही. हे एक खास अॅक्सेसरी किट आहे. गाडी आहे तीच, तिच्यावर हे किट बसवायचं. त्याची किंमत 22,990 रुपये आहे, म्हणजे ही रक्कम पूर्ण गाडीची नसून फक्त किटची आहे.
हे किट फक्त स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंटसाठीच मिळेल. या हायब्रिड मॉडेलची एक्स-शोरूम किंमत साधारण 16.43 लाख रुपयांपासून 19.99 लाख रुपयांपर्यंत आहे. जाहिरात मोहिमेसाठी बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर यांना निवडण्यात आलं आहे. 'ऑरम' हा लॅटिन शब्द आहे आणि त्याचा अर्थ सोनं असा होतो.
बाहेरून पाहिलं तर या किटमुळे तांब्याच्या रंगाचे इन्सर्ट्स दिसतात. ते पुढच्या, बाजूच्या आणि मागच्या स्किड प्लेट्सवर तसेच व्हील आर्चेसवर लावले जातात. शिवाय पुढची ग्रिल, फेंडर्स, बंपर्स, बॉडी-साइड मोल्डिंग्स आणि डोअर व्हायझर्स यांवर क्रोमचं काम केलं आहे. गाडीच्या एकूण डिझाईनमध्ये मात्र काहीच फेरफार केलेला नाही, फक्त लूकला वेगळी ओळख मिळते.
आतल्या बाजूला सगळ्या हवामानात टिकणारी 3D फ्लोअर मॅट्स, 3D बूट मॅट आणि मागच्या ट्रंकच्या कडेला बसवायचा सिल गार्ड मिळतो. प्रवाशांची सुरक्षा आणि रोजच्या वापरातली सोय डोळ्यासमोर ठेवून हे सगळं दिलं आहे.
इंजिन आणि परफॉर्मन्समध्ये कंपनीनं कसलाही बदल केलेला नाही. व्हिक्टोरिसमध्ये तीन पर्याय मिळतात: 1.5-लिटर पेट्रोल, पेट्रोल-सीएनजी आणि 1.5-लिटर स्ट्राँग हायब्रिड. पेट्रोल इंजिन 103.06 PS ताकद आणि 139 Nm टॉर्क देतं. सीएनजी व्हेरिएंट पेट्रोल मोडवर 100.6 PS आणि सीएनजी मोडवर 87.8 PS देतो. हायब्रिडमध्ये 1.5 लिटरचं तीन सिलेंडरचं पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर एकत्र काम करतात, आणि मिळून सुमारे 116 बीएचपी ताकद तयार होते. गिअरबॉक्ससाठी 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि e-CVT असे पर्याय आहेत. हायब्रिडला e-CVT ऑटोमॅटिक मिळतो. ही गाडी शुद्ध इलेक्ट्रिक (EV) मोडवरही चालवता येते. ARAI च्या दाव्यानुसार तिचं मायलेज 28.65 किलोमीटर प्रति लिटर आहे.
विक्रीचा आकडाही कंपनीसाठी समाधानाचा आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार लाँचनंतर व्हिक्टोरिसनं 1 लाख आणि 1.5 लाख युनिट्सच्या एकत्रित विक्रीचे टप्पे इतर कोणत्याही गाडीपेक्षा लवकर गाठले. पहिल्या वर्षात सुमारे 1.47 लाख गाड्या विकल्या गेल्या. याच यशाचा आनंद साजरा करण्यासाठी कंपनीनं ऑरम नावानं हे किट आणलं. स्टाइल आणि आधुनिक फीचर्स आवडणाऱ्या तरुणांना आणि लूकला महत्त्व देणाऱ्या ग्राहकांना हायब्रिड तंत्रज्ञानासोबत वेगळा बाज मिळेल, असं यातून दिसतं.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.