10 लाखांच्या आत सीएनजी ऑटोमॅटिक कार हव्यात? टाटा-मारुतीचे 5 पर्याय बघा
सीएनजी कार म्हणजे मॅन्युअल गिअरची कटकट, हे समीकरण आता बदललंय. टाटा आणि मारुती सुझुकीच्या 5 सीएनजी-एएमटी गाड्या 10 लाखांच्या आत मिळतात.
पूर्वी सीएनजी कार घ्यायची म्हणजे गिअर बदलत बसायचंच, कारण सीएनजी गाड्यांमध्ये फक्त मॅन्युअल गिअरबॉक्सचाच पर्याय असायचा. पण आता हे चित्र झपाट्याने बदललंय आणि ऑटोमॅटिक म्हणजे एएमटी सीएनजी गाड्या बाजारात आल्यात. शहरातलं ट्रॅफिक आणि वाढते पेट्रोल-डिझेलचे भाव बघता, 10 लाख रुपयांच्या आत मिळणाऱ्या टाटा आणि मारुती सुझुकीच्या 5 सीएनजी-एएमटी कार्सचा विचार नक्की करता येईल.
यात सगळ्यात स्वस्त गाडी आहे टाटा टियागो सीएनजी एएमटी. हिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.13 लाख रुपयांपासून सुरू होते आणि व्हेरियंटनुसार ती 8.62 लाख रुपयांपर्यंत जाते. या गाडीत टाटाचं 1.2 लीटरचं थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन सीएनजी आणि 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्ससोबत दिलंय. टाटाचं खास ट्विन-सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञान असल्यामुळे पारंपरिक सिंगल-सिलेंडर गाड्यांपेक्षा बूट स्पेस इथे जास्त मिळते. मायलेज आहे 28.06 km/kg.
मारुती सुझुकीनं आपल्या लोकप्रिय स्विफ्ट हॅचबॅकमध्येही सीएनजी सोबत एएमटीचा पर्याय दिलाय. स्विफ्ट सीएनजी एएमटीची किंमत 7.92 लाख रुपयांपासून सुरू होते आणि हा ऑटोमॅटिक व्हर्जन VXi, VXi (O) आणि ZXi या व्हेरियंट्समध्ये मिळतो. 1.2 लीटर Z-सीरीज पेट्रोल इंजिनसोबत 5-स्पीड एएमटी दिलेला असून कंपनीच्या दाव्यानुसार मायलेज 35.34 km/kg आहे. कॉम्पॅक्ट साईज आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्समुळे शहरातल्या ट्रॅफिकमध्ये चालवायला ही गाडी सोयीची ठरते.
प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती बलेनोलाही आता एएमटी पर्याय मिळालाय. या ऑटोमॅटिक सीएनजी मॉडेलची किंमत 8.32 लाख रुपयांपासून सुरू होते, यातही 5-स्पीड एएमटी आणि 1.2 लीटर Z-सीरीज इंजिन आहे. दावा केलेला मायलेज 34.47 km/kg इतका आहे. स्विफ्टच्या तुलनेत बलेनोमध्ये केबिन मोठी आणि फीचर्स जास्त मिळतात, त्यामुळे एसयूव्हीऐवजी प्रशस्त आणि इंधन-बचत करणारी गाडी हवी असणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.
एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा पंच आय-सीएनजी एएमटी लोकप्रिय आहे. याची सुरुवातीची किंमत 8.77 लाख रुपये असून वरचे व्हेरियंट्स 10 लाखांच्या पुढेही जातात. यात 1.2 लीटर थ्री-सिलेंडर इंजिन आणि 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्स आहे. बूट फ्लोअरच्या खाली दोन सीएनजी टाक्या बसवल्यामुळे बूट स्पेस भरपूर शिल्लक राहते, शिवाय पॅडल शिफ्टर्स मिळतात आणि गाडी थेट सीएनजी मोडवर सुरू करता येते. मायलेज 26.99 km/kg आहे.
मारुतीची डिझायर ही सीएनजी-एएमटी अवतारातली लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडान आहे, किंमत 8.53 लाख रुपयांपासून सुरू होते. 1.2 लीटर Z-सीरीज इंजिन, S-CNG तंत्रज्ञान आणि 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्स यात दिलाय. डिझायरचा मायलेज 36.47 km/kg इतका आहे, म्हणजे मारुतीच्या या तिन्ही नव्या सीएनजी-एएमटी मॉडेल्समध्ये सर्वात जास्त मायलेज देणारी ही गाडी ठरते. सर्व किमती एक्स-शोरूम असून मायलेजचे आकडे कंपन्यांनी दावा केलेले आहेत.