माधुरी दीक्षित करणार 'कोण होणार करोडपती'चं सूत्रसंचालन, पहिल्या भागात सोनाली बेंद्रे
12 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या शोमध्ये माधुरी आणि सोनाली पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मराठीतला सगळ्यात मोठा शो मानला जाणारा 'कोण होणार करोडपती' आता नव्या रंगरूपात येत आहे. यंदा पहिल्यांदाच या शोची संपूर्ण जबाबदारी एका अभिनेत्रीकडे दिली गेली आहे. ही अभिनेत्री म्हणजे लाखो चाहत्यांच्या मनात घर करणारी 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित. येत्या 12 ऑक्टोबरपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून माधुरी तो होस्ट करणार आहे.
या नव्या प्रवासासाठी महानायक अमिताभ बच्चन यांनी माधुरी दीक्षित यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शोच्या पहिल्याच भागात बॉलीवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रे पाहुणी म्हणून येणार आहे. दोन अभिनेत्री एकाच मंचावर येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
माधुरी आणि सोनाली यांनी आजवर अनेक सिनेमे केले आहेत. मात्र या दोघींनी कधीच एकत्र काम केलेलं नाही, एकत्र स्क्रीन शेअर केलेली नाही. ही गोष्ट दोघींनाही खटकते.
सोनाली बेंद्रे सेटवर म्हणाली, "I Just Love Her! माधुरीजी जे काही करतात ते मला खूप आवडते. मी खरंच त्यांची खूप मोठी फॅन आहे. माझ्यासाठी सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे माधुरी मॅमचा धाकटा मुलगा आणि माझा मुलगा दोघेही एकाच शाळेत, एकाच वर्गात आहेत. त्यामुळे आम्ही शाळेत पालक म्हणून नेहमी भेटतो. पण आता KBC च्या सेटवर भेटल्यावर आणखी छान आठवणी बनतील."
यावर माधुरी म्हणाली, "मी आणि सोनालीने खरंच आजपर्यंत एकत्र काम केले नाहीये. पण अजून उशीर झालेला नाही. आज आम्ही दोघी या मंचावर एकत्र आलो आहोत आणि हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे."
पुढे सोनालीने थेट लेखक आणि दिग्दर्शकांनाच विनंती केली. ती म्हणाली, "आम्ही शाळेत भेटतो पण पडद्यावर कधीच एकत्र आलो नाही. मी माधुरीजींच्या अभिनयाची, त्यांच्या डान्सची जबरदस्त चाहती आहे. जर कोणी लेखक किंवा दिग्दर्शक आम्हाला बघत असेल तर प्लीज आम्हा दोघींसाठी एक स्क्रिप्ट लिहा. मला माधुरीजींसोबत काम करायला खूप जास्त आवडेल."
12 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या शोमध्ये फक्त प्रश्न आणि उत्तरंच नसतील, तर अनेक खास एपिसोडही पाहायला मिळणार आहेत. माधुरी होस्ट असल्यामुळे शोमध्ये डान्स, मस्ती आणि भावनिक क्षणही जास्त बघायला मिळणार आहेत.
सोनाली बेंद्रे असलेला एपिसोड प्रेक्षकांसाठी जणू मेजवानीच ठरणार आहे. दोन्ही अभिनेत्री पहिल्यांदाच एका मंचावर येत आहेत. या दोघींनी दिग्दर्शकांना खुली ऑफर दिली आहे की, कोणीतरी आमच्यासाठी एक स्क्रिप्ट तयार करा, आम्हा दोघींना एकत्र काम करायला खूप आवडेल. या खुल्या ऑफरला कोणता दिग्दर्शक प्रतिसाद देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.