मणिपूरच्या तीन डोंगराळ जिल्ह्यांत नागा-कुकी चकमकी, 9 जणांचा मृत्यू
कामजाँग, उखरुल आणि कांगपोकपी जिल्ह्यांत रविवारी नागा आणि कुकी समाजांत चकमकी झाल्या. मुख्यमंत्री यमुनाम खेमचंद सिंह यांनी शांततेचे आवाहन केले आहे.
मणिपूरच्या डोंगराळ भागातील कामजाँग, अखरुल आणि कांकपोकमी या तीन जिल्ह्यांत रविवारी मोठ्या प्रमाणात धुमश्चक्री पाहायला मिळाली. नागा आणि कुकी समाजांमधील या नव्या हिंसक चकमकींत आतापर्यंत 9 जणांचा जीव गेला आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली.
अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या हिंसेत 6 नागा आणि 2 कुकी तसेच गोरखा समुदायाच्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यंदाच्या वर्षी मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांपैकी ही सर्वात घातक घटना असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री यमुनाम खेमचंद सिंह यांनी हिंसा आणि निर्दोष नागरिकांच्या हत्येचा निषेध केला असून लोकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने योग्य ती पावले उचलण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी एक्स आणि फेसबुकवर पोस्ट केली. त्यात ते म्हणाले की, कामजाँग आणि कांगपोकपी जिल्ह्यांतील निर्दोष नागरिकांची हत्या आणि हिंसाचार यांचा मी निषेध करतो. परिस्थिती नियंत्रणात आणणे, शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे आणि सर्व नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे यासाठी तातडीने व प्रभावी नियोजन करण्याचे आदेश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
विविध समुदाय, जनप्रतिनिधी आणि नागरिक संघटनांनी पुढे येऊन संयम राखावा आणि तणाव कमी करण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. समाजातील विविध घटकांनी शांतता, संवाद आणि आपापसांत सद्भावना निर्माण करण्याला प्राधान्य द्यावे, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिंसेचा प्रभाव पाहता तिन्ही जिल्ह्यांत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि मणिपूर पोलिसांनी गस्त तसेच शोधमोहीम वेगवान केली आहे, जेणेकरून परिस्थिती आणखी बिघडू नये. हा हिंसाचार शुक्रवारी रात्री कामजाँग जिल्ह्यातील चासाद गावातील 42 वर्षीय महिलेच्या हत्येनंतर सुरू झाला. कामजाँग जिल्ह्यात मुख्यत्वे नागा समुदाय मोठ्या संख्येने राहतो, पण चासाद गावात कुकी समुदायाचे लोक बहुसंख्य आहेत.
पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने इंफाळमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाच मुलांची आई असलेल्या डोमखोनेई ताउथांग यांच्या गळ्यात गोळी मारण्यात आली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या महिलेच्या हत्येनंतर कुकी आणि नागा समुदायांतील सशस्त्र गटांमध्ये बेधुंद गोळीबार सुरू झाला, जो शनिवारपर्यंत सुरू होता. या काळात 23 वर्षीय एका तरुणाचाही मृत्यू झाला. तसेच 10 पेक्षा जास्त घरे जाळण्यात आली. कुकी-जो संघटनेने महिलेच्या हत्येसाठी सुरक्षा दल आणि नागा सशस्त्र गटाला जबाबदार धरले आहे.
हिंसेनंतर कामजाँगच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम 163 अंतर्गत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा जमाव, ज्वलनशील व धोकादायक वस्तू बाळगणे, तसेच कर्फ्यू लावलेल्या ठिकाणी ये-जा करणे यांवर बंदी घालण्यात आली आहे.
कांगपोकपी जिल्ह्यात शनिवारी एका वेगळ्या घटनेत संशयित माओवाद्यांनी टापोन आणि मकुई गावावर हल्ला केला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात नागा समुदायातील दोन ग्राम रक्षक एम. दैमाई आणि आर. गंगमेई यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला. तिसऱ्या मृत व्यक्तीची ओळख रिंगकांगमाई अशी पटली आहे.
नागा नागरिक संघटन वर्किंग कमेटी जेटीसी मणिपूर यांनी दावा केला आहे की, 52 वर्षीय ग्रामस्थ अजिनबौ आर. यांचे शिर माओवाद्यांनी धडापासून वेगळे केले. कापलेले शिर कुटुंबाला परत द्यावे, म्हणजे त्यांच्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करता येतील, अशी मागणी संघटनेने केली आहे.
आणखी एका हल्ल्यात कामजाँग जिल्ह्याच्या भारत-म्यानमार सीमेजवळील तांगखुल नागा बहुल निंगचौ गावात संशयित माओवाद्यांनी गोळीबार केला. यात 35 वर्षीय नगाचांसो निंगशेन आणि 48 वर्षीय लेइशिशान लेइशादांग यांचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल गावात पोहोचले, तोपर्यंत हल्लेखोर माओवादी म्यानमारच्या दिशेने पळून गेले, असा दावा स्थानिकांनी केला आहे.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, यंदाच्या फेब्रुवारीत प्रभावित जिल्ह्यांत कुकी आणि नागा समुदायांमध्ये झालेल्या हिंसाचारात 40 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. अनेकांची घरे तेव्हाही जाळण्यात आली होती. हा हिंसाचार प्रामुख्याने उखरुल, कामजाँग, कांगपोकपी, तमेंगलाँग आणि नोनी जिल्ह्यांत, तसेच सेनापती जिल्ह्यातील काही भागांत झाला होता.