मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:59 IST

कुर्ल्यातील १३ मजली कोहिनूर HDIL इमारतीला आग; पाच वर्षांच्या मुलासह नऊ जण जखमी

मुंबईतील कुर्ला पश्चिम भागात मंगळवारी पहाटे इलेक्ट्रिक डक्टच्या वायरिंगला आग लागून इमारतीत धूर पसरला. आठ जणांना श्वसनाचा त्रास झाला, तर एकाच्या उजव्या पायाला दुखापत झाली.

कुर्ल्यातील १३ मजली कोहिनूर HDIL इमारतीला आग; पाच वर्षांच्या मुलासह नऊ जण जखमी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मुंबईतील कुर्ला पश्चिम भागात मंगळवारी पहाटे एका उंच इमारतीत आग लागली. येथील कोहिनूर HDIL इमारत क्रमांक ५ मधील इलेक्ट्रिक डक्टच्या वायरिंगला अचानक आग लागली आणि बघता बघता संपूर्ण इमारतीत धूर पसरला. ही इमारत तळमजला अधिक १२ मजल्यांची आहे. या घटनेत पाच वर्षांच्या मुलासह एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे जवान, मुंबई पोलीस, महावितरणचे कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. इमारतीतील इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगला आग लागल्यामुळे ज्वाळा आणि धूर मोठ्या प्रमाणात पसरला. आगीची तीव्रता वाढल्याने वेगवेगळ्या मजल्यांवरील लोखंडी दरवाज्यांचेही नुकसान झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सकाळी ७ वाजून २१ मिनिटांच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.

आगीमुळे इमारतीत धूर मोठ्या प्रमाणात साचला होता. या धुरामुळे आठ जणांना श्वसनाचा त्रास झाला, तर एका व्यक्तीच्या उजव्या पायाला दुखापत झाली. जखमींमध्ये पाच वर्षांचा मोहम्मद शेख, दोन अल्पवयीन मुली आणि ६५ वर्षांचे एक वृद्ध यांचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे.

जखमींमध्ये ईशान अहमद (३०), फरिना बोनो (२७), एजाज अहमद (६५), फरीन शेख (१८), नायदा शेख (१४), कलिमा सहा (४५), अलिना शेख (१७) आणि जाहेद अली शेख (५५) यांचा समावेश आहे. यापैकी जाहेद अली शेख यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. नवव्या जखमीमध्ये पाच वर्षांच्या मोहम्मद शेखचा समावेश आहे.

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगला आग कशी लागली, याचा तपास पोलीस आणि अग्निशमन दलाकडून केला जात आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ