बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:14 IST

कोकणातील सद्गुरू श्री साटम महाराजांच्या जीवनावर येतोय मराठी चित्रपट 'दाणोलीश्वर'

'दाणोलीश्वर : सद्गुरू श्री साटम महाराज' या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून, महाराजांचा आध्यात्मिक प्रवास प्रथमच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

कोकणातील सद्गुरू श्री साटम महाराजांच्या जीवनावर येतोय मराठी चित्रपट 'दाणोलीश्वर' छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कोकणभूमीत परमपूज्य मानल्या जाणाऱ्या सद्गुरू श्री साटम महाराजांची जीवनगाथा प्रथमच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'दाणोलीश्वर : सद्गुरू श्री साटम महाराज' असे या आगामी मराठी चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आणि त्यानंतर या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

या चित्रपटातून महाराजांचे आध्यात्मिक जीवन, त्यांची शिकवण आणि त्यांचे कार्य प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सद्गुरू श्री साटम महाराजांचे जीवनकार्य, शिकवण आणि आध्यात्मिक विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू या चित्रपटामागे आहे, असे दिग्दर्शक विराज राजे यांनी स्पष्ट केले आहे.

महाकाली प्रॉडक्शन आणि स्मिता क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती होत आहे. मिलिंद सावंत, सुषमा मिलिंद घोगळे सावंत आणि स्मिता घाग हे निर्माते आहेत, तर रणजित विठ्ठल चव्हाण सहनिर्माते आहेत. कमलवल्लभदास यांनी लिहिलेल्या 'दाणोलीश्वर' या पुस्तकाचा संदर्भ घेऊन पराग कुलकर्णी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी विराज राजे सांभाळणार आहेत.

या चित्रपटासाठी सद्गुरू चिटणीस बाबा (डॉ. शशिकांत चिटणीस) आणि प.पू. बाळूमामा दळवी (शिरसंगी) यांचे आशीर्वाद लाभले आहेत. त्याशिवाय दाणोली समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त व कार्यकारी मंडळ, बबी देवळे, श्रीमंत सरकार खेमराज शिवराम राजे सावंत भोसले आणि दाणोली बाजार तरुण मंडळ यांचे सहकार्य मिळणार आहे.

समर्थ शंकर साटम महाराज यांचा जन्म १८८४ साली अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर झाला. मुंबईतून एका सामान्य व्यक्तीप्रमाणे त्यांचा प्रवास सुरू झाला आणि पुढे तो आध्यात्मिक वळणावर पोहोचला. भारतभ्रमण केल्यानंतर त्यांची पावले कोकणातील पावन भूमीकडे वळली. सावंतवाडी परिसरातील दाणोली या गावात त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला स्थैर्य लाभले.

१९३७ पर्यंतच्या वास्तव्यात महाराजांनी अनेक लीला केल्याचे भाविक मानतात. संकटात सापडलेल्या भाविकांना मार्गदर्शन करून त्यांचे जीवन सावरण्याचा आणि समाजाला मानवी मूल्यांची शिकवण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दाणोली येथे समाधी घेतल्यानंतरही भाविकांच्या मनातील श्रद्धा कायम आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत यापूर्वीही साधू-संत आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित चित्रपट आले आहेत. आता या यादीत 'दाणोलीश्वर'ची भर पडणार आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाच्या कथेविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.

चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. सद्गुरू श्री साटम महाराजांची मुख्य भूमिका कोणता अभिनेता साकारणार, याबाबत निर्मात्यांनी गुप्तता राखली आहे. त्यामुळे कोणाची निवड झाली आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. कलाकार आणि प्रदर्शनाची तारीख याबाबत निर्माते पुढे काय घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ