आयआयटी मुंबईचे नवे तंत्र: रक्ताच्या एका थेंबातून अॅनिमिया आणि सिकलसेलचे निदान
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी काचेच्या पट्टीवर पसरलेल्या रक्ताच्या लेपाच्या लांबीवरून अॅनिमिया आणि सिकलसेल ओळखण्याची स्वस्त पद्धत विकसित केली आहे.
रक्ताचा एकच थेंब आणि एक काचेची पट्टी, एवढ्यावरून अॅनिमिया आणि सिकलसेल हे दोन आजार ओळखता येणार आहेत. आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी हे किफायतशीर तंत्रज्ञान विकसित केले आहे. काचेच्या पट्टीवर रक्ताचा थेंब पडल्यावर तो किती लांबपर्यंत पसरून लेप तयार होतो, यावरून आजाराची ओळख पटवली जाते.
या तंत्रासाठी सुसज्ज पॅथॉलॉजी प्रयोगशाळेची गरज नाही. त्यामुळे दुर्गम भागांतील आणि आदिवासी समुदायांतील रुग्णांसाठी निदानाचा नवा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
आयआयटी मुंबईच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागातील प्रा. महेश तिरुमकुडुलू यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी रक्ताच्या दाटपणाचा अभ्यास केला. नियंत्रित पद्धतीने काचेच्या पट्टीवर रक्ताचा थेंब पसरवला जातो आणि तयार झालेल्या लेपाची लांबी मोजली जाते. रक्तातील लाल पेशींचे प्रमाण, प्लाझ्माची दाटपणा आणि पेशींची लवचिकता यांमुळे या लांबीत फरक पडतो. निदानासाठी याच फरकाचा उपयोग करण्यात आला आहे.
सिकलसेलच्या निदानासाठी रक्तातील ऑक्सिजन कमी केल्यानंतर होणारा बदल मोजण्यात आला. त्यासाठी सोडियम मेटाबायसल्फाइट हे स्वस्त रसायन वापरले गेले. महाराष्ट्र आणि मध्य भारतातील आदिवासी भागांतील ३९४ जणांवर या चाचण्या झाल्या. त्यातून निरोगी व्यक्ती, सिकलसेलचे वाहक आणि बाधित रुग्ण यांच्यातील फरक स्पष्ट दिसला. या पद्धतीने सुमारे ९५ टक्के बाधित रुग्णांची योग्य ओळख पटवता आली.
सिकलसेलवरील उपचारांसाठी हायड्रॉक्सियुरिया हे औषध वापरले जाते. त्याचा परिणाम तपासण्यासाठीही हे तंत्रज्ञान उपयोगी ठरू शकते. उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या रक्तातील श्यानतेत अपेक्षित बदल होत असल्याचे संशोधकांना आढळले. त्यामुळे उपचारांना रुग्णाचा प्रतिसाद कसा आहे हे तपासायला मदत होऊ शकते.
तीव्र अॅनिमियाच्या निदानासाठी ५१६ जणांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अभ्यास झाला. त्यात हिमोग्लोबिनचे प्रमाण आणि रक्ताची श्यानता यांचा संबंध आढळला. या पद्धतीने तीव्र अॅनिमिया असलेल्या ९५.१ टक्के व्यक्तींची, तर हा आजार नसलेल्या ८६ टक्के व्यक्तींची योग्य ओळख पटवता आली. हिमोग्लोबिनचे प्रमाण अंदाजे +/-०.८ ग्रॅम प्रति डेसीलिटर अचूकतेने ओळखता आले.
या संशोधनाच्या प्रथम लेखिका डॉ. महरूख मीर आहेत. त्यांचा शोधनिबंध 'लॅब ऑन अ चिप' या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक वापरासाठी 'रिओहीम प्रायव्हेट लिमिटेड' या स्टार्टअपला परवाना देण्यात आला आहे. प्रत्यक्ष वापर आणि आवश्यक प्रशासकीय मान्यतांसाठी संशोधक संबंधित संस्थांसोबत काम करत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.