खटाव पंचायत समितीत 'माझे गाव आरोग्यसंपन्न गाव' विषयावर एकदिवसीय कार्यशाळा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वडूज येथील खटाव पंचायत समितीत आरोग्य विभागाने एकदिवसीय कार्यशाळा घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे यांनी उद्घाटन करून गावोगावी स्वच्छता आणि आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
वडूज येथील खटाव पंचायत समितीत आरोग्य विभागातर्फे "माझे गाव आरोग्यसंपन्न गाव" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन झाले.
यावेळी बोलताना प्रियाताई शिंदे म्हणाल्या, "माझे गाव - आरोग्यसंपन्न गाव" ही केवळ एक संकल्पना नसून निरोगी, स्वच्छ आणि समृद्ध समाज घडवण्याची एक महत्त्वाची चळवळ आहे. गावाचा खरा विकास फक्त रस्ते, पाणी आणि इमारती एवढ्यापुरता मर्यादित नसतो. गावातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य उत्तम असणे, हीच विकासाची खरी ओळख आहे.
प्रत्येक गावात स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, संतुलित आहार, नियमित आरोग्य तपासणी, माता व बाल आरोग्य संवर्धन, लसीकरण आणि संसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती यांना प्राधान्य द्यायला हवे, असे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, शाळा, अंगणवाडी आणि ग्रामस्थ यांनी मिळून सहभाग घेतला, तरच आरोग्यसंपन्न गावाचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते, असेही शिंदे यांनी सांगितले. या अभियानातून प्रत्येक गावाने आरोग्याबाबत जागरूक होऊन स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगीकाराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक बालक निरोगी, प्रत्येक माता सुरक्षित, प्रत्येक कुटुंब आरोग्यसंपन्न आणि प्रत्येक गाव रोगमुक्त व्हावे, असे सांगत त्यांनी सर्वांनी अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
पंचायत समितीच्या सभापती श्रीमती वनिता दुबळे, उपसभापती श्रीमती रेश्मा शेडगे आणि पंचायत समिती सदस्यांनी यावेळी आपले विचार मांडले. सिद्धेश्वर-कुरोली गणाचे पंचायत समिती सदस्य श्री. मनोज देशमुख यांनी तालुक्यातील प्रत्येक गावातील आरोग्यविषयक अडचणी आणि समस्या त्या भागातील पंचायत समिती सदस्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन केले.
"माझे गाव - आरोग्यसंपन्न गाव" या कार्यक्रमांतर्गत गावात बैठक घेतली जाईल, तेव्हा संबंधित पंचायत समिती सदस्यांना आवर्जून बोलवावे, अशी सूचनाही देशमुख यांनी केली. गावातील आरोग्यविषयक समस्या आणि इतर अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्व पंचायत समिती सदस्य कटिबद्ध आहोत, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रोजच्या जीवनात आरोग्याची योग्य काळजी घेण्याबाबत त्यांनी महत्त्वाच्या सूचना आणि सल्ला दिला. सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. आरोग्यसंपन्न गाव घडवण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यशाळेला जिल्हा परिषद सदस्या श्रीम. मनीषा फडतरे यांची विशेष उपस्थिती होती. पंचायत समिती सदस्य शशिकांत रोमन, हनुमंत बोटे, महेश वाघ, मनोज देशमुख आणि सौ. अनिताताई कोळी हेही उपस्थित होते.


कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.