कर्जतच्या टोरंट प्रकल्पावर भाजपची भूमिका, बाहेरच्या नेत्यांना आवाहन
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
टोरंट प्रकल्पाबाबत कर्जतमध्ये भाजपने पत्रकार परिषद घेतली. प्रकल्पग्रस्तांशी बोलणार असल्याचे सांगून बाहेरच्या लोकांनी तालुक्यातील वातावरण दूषित करू नये, असे आवाहन करण्यात आले.
टोरंट प्रकल्पाबाबत भारतीय जनता पक्षाने कर्जत येथे पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची सगळी सविस्तर माहिती दिली आहे, असे भाजप जिल्हा मंत्री दीपक बेहरे यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रकल्प होत असलेल्या भागात भाजपचे कार्यकर्ते जातील, स्थानिकांशी बोलतील आणि त्यांना काय हवे आणि काय नको ते पाहतील, असे आश्वासन बेहरे यांनी दिले. तसेच बाहेरच्या लोकांनी कर्जतमध्ये येऊन लुडबुड करू नये, असे जाहीर आवाहन भाजपकडून करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला जिल्हा मंत्री दीपक बेहरे, जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेश भगत, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे आणि नितीन कांदळगावकर हजर होते. माजी जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर, मंडळ अध्यक्ष नरेश मसणे, माजी नगराध्यक्ष शरद लाड, माथेरानचे उपनगराध्यक्ष संतोष शेलार आणि भाजप किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष अतुल बडगुजर हेही उपस्थित होते.
सुरुवातीलाच बेहरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री स्वतः बोलून त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. हा पर्यावरणपूरक प्रकल्प देशासाठी आणि राज्यासाठी गरजेचा आहे, असे ते म्हणाले. हा प्रकल्प कर्जतच्या हिताचा आहे, म्हणून त्याला विरोध नको, अशी आमची मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले.
बेहरे यांनी पुढे म्हटले की, आपल्याला चंद्रपूरमधून वीज येते, मग आपण बाहेरून वीज येते असे म्हणतो का? हा प्रकल्प कर्जतच्या हिताचा आहे आणि इथल्या लोकांना व्यवसाय मिळेल. त्याच वेळी स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. जनतेला न्याय मिळाला पाहिजे, टोकाचा विरोध करू नये, आणि आम्ही कार्यकर्ते तिथे जाऊन प्रकल्पग्रस्तांशी बोलणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. तालुक्याच्या बाहेरच्या लोकांनी आणि नेत्यांनी कर्जतमध्ये येऊन तालुक्याचे वातावरण दूषित करू नये, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.
जिल्हा चिटणीस रमेश मुंढे यांनीही आपले म्हणणे मांडले. सगळीकडे जो गदारोळ सुरू आहे तो कशासाठी आहे, हे तुम्हाला आणि आम्हाला माहिती नाही, असे ते म्हणाले. सर्व परवानग्या मिळवूनच हा प्रकल्प सुरू होत आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारत घडवण्याचा नारा दिला आहे आणि त्यासाठी वीज आणि पाणी महत्त्वाचे असल्याने धरणे आणि वीज ही अत्यावश्यक बाब आहे, असेही मुंढे म्हणाले. बाहेरच्या लोकांनी येथे येऊन कर्जत तालुक्याचे वातावरण दूषित करू नये, असे आवाहन त्यांनी विरोधी पक्षाला केले.
जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेश भगत यांनी सांगितले की, पंतप्रधानांचा दौरा नियोजित नव्हता आणि ती केवळ अफवा होती. मात्र देशाचे पंतप्रधान कर्जतला येणार असतील, तर आम्ही स्वागताला तयार राहू आणि इथले प्रश्न मार्गी लावू, अशी माहिती त्यांनी दिली.
परिषदेत पुढे असेही सांगण्यात आले की, प्रकल्प खासगी असला तरी तो पीपीपीमधून साकारला जात आहे. त्यामुळे सरकार या प्रकल्पाला सर्व परवानग्या मिळवून देत होते आणि म्हणूनच प्रकल्प येत आहे. फेक नॅरेटिव्ह म्हणजे काय, तर झाडे तोडली आहेत हे खरे, पण वन विभाग तिप्पट झाडे लावणार आहे, अशी माहितीही देण्यात आली.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.