मानपाडा-तळोजा 'मेट्रो 12 अ'ला मंजुरी; कल्याण-शिळफाट्यावर 18.4 किमीचा उन्नत मार्ग, 12 स्थानके
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मानपाडा-कल्याणफाटा-तळोजा या 18.4 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
कल्याण-शिळफाटा आणि आसपासच्या परिसरातील लोकांना रोज वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यावर आता मोठा निर्णय झाला आहे. 18.4 किलोमीटर लांबीच्या 'मेट्रो मार्ग 12 अ' (मानपाडा - कल्याणफाटा - तळोजा) या विस्तारित मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि राज्य सरकारच्या मंजुरीनंतर हा प्रकल्प पुढे सरकला आहे.
मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत प्रकल्पाला अधिकृत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांमधला प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
या प्रकल्पाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे 'डबल डेकर' म्हणजेच एकात्मिक वाहतूक व्यवस्था राबवली जाणार आहे. मेट्रो मार्गिकेसोबतच उड्डाणपुलांचीही उभारणी होईल. यात 6.93 किमी लांबीचा चारपदरी आणि 8.69 किमी लांबीचा सहापदरी एकात्मिक उड्डाणपूल समाविष्ट आहे. त्यामुळे रस्त्यावरचा आणि मेट्रोवरचा प्रवासाचा ताण एकाच वेळी कमी होण्यास मदत होईल.
एमएमआरडीएच्या (MMRDA) आकडेवारीनुसार, रस्त्याने जाण्याच्या तुलनेत या मार्गिकेमुळे प्रवाशांचा सुमारे 40 ते 50 टक्के वेळ वाचणार आहे. या मार्गावरून दररोज सुमारे 4 लाख 74 हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे.
हा संपूर्ण मार्ग उन्नत असून त्यावर एकूण 12 आधुनिक स्थानके असतील. ही स्थानके अशी: मानपाडा, काटे नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडले गाव, कल्याणफाटा, गोलघर गाव, दहिसर मोरी, दहिसर गाव, किरवली गाव, रोहिंजन आणि खटारी गाव. सर्व स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी 'फीडर बससेवा' उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या मार्गाची इतर मार्गिकांशीही जोडणी केली जाणार आहे. काटई नाका येथे मेट्रो मार्गिका 12 आणि बुलेट ट्रेन जोडमार्गाशी, काटई नाका ते कल्याणफाटा दरम्यान मेट्रो मार्गिका 14 शी आणि अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो मार्गिका 1 शी ही इंटरकनेक्टिव्हिटी असेल.
ठाणे जिल्ह्यातील इतर मेट्रो प्रकल्पांनाही गती मिळत आहे. गायमुख ते कॅडबरी दरम्यानच्या मेट्रो मार्गिका क्रमांक 4 च्या पहिल्या टप्प्यातील सेवा येत्या डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. मेट्रो आणि पर्यटन विकासाच्या विविध कामांमुळे येत्या काही वर्षांत ठाणे आणि कल्याण परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षेत्रांना नवी गती मिळेल, तसेच रोजगार आणि व्यवसायाच्या हजारो नव्या संधी उपलब्ध होतील.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.