मानपाडा ते तळोजा मेट्रो १२-अ ला मंजुरी, १८.४० किमी मार्ग साडेतीन वर्षांत उभारण्याचे आदेश
मानपाडा-काटई नाका ते तळोजा या १८.४० किमी लांबीच्या मेट्रो मार्गिका १२-अ ला मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मानपाडा-काटई नाका ते तळोजा (कल्याण फाटा मार्गे) या भागाला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो लाईन १२-अ ला मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली आहे. हा मार्ग १८.४० किमी लांबीचा आहे. तो पुढील साडेतीन वर्षांत पूर्ण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिले.
समितीची बैठक मंत्रालयातील मंत्रिमंडळ कक्षात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल समितीच्या मंजुरीसाठी सादर केला होता. रस्त्याने प्रवास करण्याच्या तुलनेत या मेट्रोमुळे ४० ते ५० टक्के प्रवासवेळ वाचणे अपेक्षित आहे, असे डॉ. संजय मुखर्जी यांनी या वेळी सांगितले.
ही संपूर्ण मार्गिका उन्नत असून तिच्यावर १२ स्थानके प्रस्तावित आहेत. प्रकल्पात ६.९३ किलोमीटर लांबीचा चारपदरी आणि ८.६९ किलोमीटर लांबीचा सहापदरी एकात्मिक उड्डाणपूलही समाविष्ट आहे. या मार्गिकेवरून दररोज ४ लाख ७४ हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे.
इतर मार्गांशी जोडणीही प्रस्तावित आहे. काटई नाका येथे मेट्रो मार्गिका १२ आणि बुलेट ट्रेन जोडमार्ग, काटई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो मार्गिका १४, तर अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो मार्गिका १ शी जोडणी होणार आहे. सर्व स्थानकांवर फीडर बससेवाही प्रस्तावित आहे.
या मार्गिकेमुळे औद्योगिक आणि लॉजिस्टिक केंद्रांशी संपर्क वाढेल. तसेच कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या शहरांमधील वाहतूक जोडणी अधिक सक्षम होणार आहे. सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता आणि विविध वाहतूक माध्यमांतील सुविधा वाढल्याने खासगी वाहनांचा वापर कमी होण्यास मदत होईल, असे या वेळी सांगण्यात आले. परिणामी कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होईल आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची घनताही कमी होणे अपेक्षित आहे.
प्रवासाचा वेळ कमी करणे, रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करणे, पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देणे आणि प्रादेशिक आर्थिक विकासासाठी सक्षम वाहतूक व्यवस्था उभी करणे ही उद्दिष्टे या प्रकल्पामुळे साध्य होणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हा प्रकल्प राबवणार आहे. मेट्रो मार्गिका आणि एकात्मिक उड्डाणपुलाच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमण्यासही या वेळी मान्यता देण्यात आली. प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रातील निश्चित शासकीय जमिनी प्रकल्प विकास आणि निधी उभारणीसाठी प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यासही मंजुरी मिळाली.
राज्यात सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांचा वेग वाढवून ती वेळेत पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिल्या.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.