सोर्सच्या सुरक्षेची हमी मिळाली तरच एसआयटीला क्लिप, जरांगे पाटील यांची अट
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माहिती देणाऱ्याच्या सुरक्षेची हमी मागितली.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला थेट इशारा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी पुन्हा एकदा टीका केली. एसआयटीला ऑडिओ क्लिप द्यायला आपण पूर्णपणे तयार आहोत, पण त्या क्लिपच्या सोर्सची म्हणजेच माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या जीविताची आणि सुरक्षेची पूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, एसआयटीला मूळ सोर्सची गरज पडेल असे त्यांना वाटत नाही. तरीही एजन्सीला सोर्स हवाच असेल, तर फडणवीस आणि शिंदे यांनी स्वतः प्रसारमाध्यमांसमोर यावे, असे ते म्हणाले. त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेची आणि तिच्या जीविताला कोणताही धोका होणार नसल्याची जाहीर हमी त्यांनी द्यावी. ती हमी मिळाली, तरच क्लिप पुढे दिली जाईल, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली.
ऑडिओ क्लिपच्या प्रकरणावर बोलताना जरांगे म्हणाले की, क्लिपमध्ये बोलणाऱ्या लोकांना समाजाविषयी किंवा आरक्षणाविषयी कसलीही माया नव्हती. हे सगळे पैशाच्या जोरावर बोलत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्याविरोधात बोलणारे सरकारकडून पैसे घेऊन आपली बदनामी करत आहेत, असा दावा त्यांनी केला. आपल्याविरुद्ध कट रचणारे आणि या सगळ्याचे बोलवते धनी फडणवीस आणि शिंदे हेच आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. सहा कोटी मराठा समाज आपला खरा सोबती आहे आणि आपली प्रतिमा खराब करण्यासाठी नवनवीन युक्त्या लढवल्या जात आहेत, असेही ते म्हणाले.
आरक्षणाबरोबरच जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचाही मुद्दा मांडला. सरकारने नुकतीच केलेली मदत अपुरी आहे, असे ते म्हणाले. पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, हे आता शेतकऱ्यांच्याही लक्षात आले आहे, असे त्यांनी सांगितले. सरकारने सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी, नाहीतर राज्यातील मंत्र्यांसह सरकारमधल्या नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला.
शेतकऱ्यांनी निराश होऊन टोकाचे पाऊल उचलू नये आणि आत्महत्या करू नये, असे भावनिक आवाहन जरांगे यांनी केले. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राज्यभर मोठे जनआंदोलन उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या आंदोलनात गरज पडली आणि तुरुंगात जावे लागले, तरी आपण मागे हटणार नाही, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
बोलण्याच्या ओघात जरांगे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असेही सांगितले. खरे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे जनता आणि शेतकरीच आहेत, असे महत्त्वाचे विधान त्यांनी केले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.