सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:40 IST

नशिराबादमध्ये बँक मेळावा: १८ महिला समूहांना १ कोटी ८ लाखांचे कर्ज

उमेद अभियानांतर्गत सेवा संकल्प अभियानात नशिराबाद येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेत महिला स्वयंसहाय्यता समूहांसाठी मेळावा झाला.

नशिराबादमध्ये बँक मेळावा: १८ महिला समूहांना १ कोटी ८ लाखांचे कर्ज छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत महिला स्वयंसहाय्यता समूहांसाठी बँक मेळावा घेण्यात आला. शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या माध्यमातून सेवा संकल्प अभियानाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित झाला.

या मेळाव्यात तब्बल १ कोटी ८ लाख रुपयांच्या बँकिंग व्यवहारांची आणि कर्जवितरणाची प्रक्रिया पार पडल्याची माहिती देण्यात आली. त्यातच १८ स्वयंसहाय्यता समूहांना १ कोटी ८ लाखांचे कर्ज वाटण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असून बचत गटांच्या उद्योग-व्यवसायांना नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोढरे, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई आणि जिल्हा व्यवस्थापक (आर्थिक समावेशन) चंद्रकांत सोनवणे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाने हा कार्यक्रम झाला. सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषद गण नशिराबाद भादली बुद्रुक प्रभागाच्या प्रभाग समन्वयक हेमांगी किशोर टोकेकर यांनी महिला समूहांना मार्गदर्शन केले.

उमेद अभियानांतर्गत राबवले जाणारे सेवा संकल्प अभियान ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता समूहांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. महिलांना फक्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे एवढाच उद्देश नाही. त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे, आर्थिक निर्णयक्षमता वाढवणे, उद्योगशीलता निर्माण करणे आणि कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात त्यांचा सहभाग वाढवणे यालाही प्राधान्य दिले जाते.

बँक मेळाव्यांमुळे महिला समूह आणि बँक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होतो. समूहांच्या आर्थिक गरजा समजून घेणे, कर्जप्रक्रियेची माहिती देणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आणि बँकिंग व्यवहारांत पारदर्शकता राखणे या गोष्टींना विशेष महत्त्व आहे.

महिला स्वयंसहाय्यता समूह हे ग्रामीण विकासाचे प्रभावी माध्यम ठरत आहेत. बचतीतून सुरू झालेली महिलांची वाटचाल आज उद्योग, व्यवसाय, उत्पादन, विक्री आणि आर्थिक स्वावलंबनापर्यंत पोहोचत आहे. उमेद अभियानामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये आर्थिक व्यवहारांविषयी जागरूकता निर्माण होत आहे. बँकांशी समन्वय साधून व्यवसायासाठी लागणारी आर्थिक मदत मिळवण्याचा मार्ग अधिक सोपा होत आहे.

बँक मेळाव्यात जळगाव पंचायत समितीचे तालुका अभियान व्यवस्थापक रविद्र सूर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपजीविका या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले. तालुका व्यवस्थापक (आर्थिक समावेशन) स्वप्नील सोनार यांनी महिलांना आर्थिक साक्षरतेबद्दल मार्गदर्शन केले. युनियन बँक ऑफ इंडिया, नशिराबादचे बी. एम. स्वर्णेश गजभिये आणि डी. बी. एम. प्रमोद धमाले यांनीही उपस्थित राहून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना मार्गदर्शन केले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ