बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:32 IST

अमळनेरमध्ये घरफोड्यांच्या आरोपावरून मध्य प्रदेशातील दोघांना अटक, दागिने जप्त

अमळनेर पोलिसांनी शहरातील तीन घरफोड्यांचा उलगडा केला असून, दहिवद येथील जनावरांच्या चोरीप्रकरणीही तिघांना अटक केली आहे.

अमळनेर शहरात गेल्या दीड वर्षापासून घरफोड्या सुरू होत्या. याप्रकरणी मध्य प्रदेशातील दोघांना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २५० ग्रॅम चांदी आणि ११ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यामुळे शहरातील तीन घरफोड्यांचा उलगडा झाला असून, दहिवद येथील जनावरांच्या चोरीचाही पोलिसांनी छडा लावला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नवलसिंग बनसिंग अलावा (वय ४६, रा. काकडवा, ता. कुक्षी, जि. धार) हा २०२५ पासून साथीदारांसह मोटारसायकलने अमळनेरला येत होता. नवलसिंगला यापूर्वीही अटक झाली होती, मात्र न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली होती. आता त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी शहराबाहेर वाहने लावून पायी यायचे आणि बंद घरे हेरायचे. त्यानंतर पहाटे दोन ते चारच्या दरम्यान कटरने कड़ी-कोंडा व कुलूप तोडून घरफोड्या केल्या जात होत्या. ८० फुटी रस्ता, ढेकू रस्ता आणि गांधलीपुरा चौकीमागील परिसरात चोऱ्या झाल्याचे तपासात समोर आले.

पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्हे शोध पथकाला सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांना चार ते पाच वेळा मध्य प्रदेशात जावे लागले.

चौकशीत नवलसिंगने केरू उर्फ केहरू इंडिया डाबर (वय ४५, रा. बलेडी गलबेडा फलिया, ता. जोबट, जि. अलीराजपूर) याचे नाव सांगितले. त्यालाही अटक करण्यात आली. आरोपीकडून चांदीचा गणपती, शिक्का, तुकडा, कडे, करदोडे आणि वाळे तसेच सोन्याच्या अंगठ्या व गोळीसह दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे आणखी साथीदार असल्याने आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

दहिवद येथून तीन म्हशी, एक गाय आणि एक वासरू चोरीला गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी गोपाल भाईदास शिरसाठ (वय २७, रा. पिळोदा, ता. शिरपूर), संजय विठ्ठल भिल (वय २९, रा. आमोदे, ता. शिरपूर) आणि अर्जुन अनिल ठाकूर (वय १९, रा. झापडी पाडा, ता. सेंधवा) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४० हजार रुपये किमतीची म्हैस आणि चोरीसाठी वापरलेली एमपी २० जीबी १०६७ क्रमांकाची पिकअप जप्त करण्यात आली. इतर म्हशी आणि साथीदारांचा शोध सुरू आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, सूर्यकांत साळुंखे, नितीन मनोरे, प्रशांत पाटील, उज्ज्वल पाटील, उज्ज्वल म्हस्के, नितीन कापडणे, मिलिंद जाधव आणि गौरव पाटील यांनी सहभाग घेतला.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ