किया इंडियाच्या सर्व गाड्यांना सायबर सुरक्षेचे AIS 189 आणि AIS 190 प्रमाणपत्र
किया इंडियाला आपल्या संपूर्ण वाहन पोर्टफोलिओसाठी ARAI कडून AIS 189 आणि AIS 190 या मानकांची प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
किया इंडियाने आपल्या सगळ्या गाड्यांसाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) कडून AIS 189 आणि AIS 190 या दोन्ही मानकांचे 'कन्फर्मेशन ऑफ कॉम्प्लायन्स' प्रमाणपत्र मिळाल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संपूर्ण वाहन पोर्टफोलिओला ही प्रमाणपत्रे मिळाली आहेत. त्यामुळे कंपनीच्या गाड्यांमधील कनेक्टेड टेक्नोलॉजी, सायबर सुरक्षा आणि सॉफ्टवेअर अपडेट व्यवस्थापन यावर विशेष लक्ष दिले गेले आहे.
भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात गाडीची सुरक्षितता आता फक्त एअरबॅग्स, ब्रेक्स आणि क्रॅश टेस्टपुरती राहिलेली नाही. आधुनिक कारमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी, डिजिटल सिस्टीम आणि सॉफ्टवेअर अपडेट्सचा वापर वाढत आहे. त्यामुळे सायबर सुरक्षाही महत्त्वाची झाली आहे. अशा परिस्थितीत किया इंडियाने ही घोषणा केली आहे.
AIS 189 हे वाहन उत्पादकाच्या सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टीमशी संबंधित आहे. यात संभाव्य सायबर धोक्यांचे मूल्यांकन, सुरक्षा व्यवस्थापन, धोक्यांवर सतत लक्ष ठेवणे आणि एखादी अडचण आल्यास योग्य उपाय करण्याच्या प्रक्रिया येतात.
AIS 190 हे सॉफ्टवेअर अपडेट मॅनेजमेंट सिस्टीमशी (SUMS) संबंधित आहे. आधुनिक कारमध्ये काही अपडेट्स इंटरनेटच्या माध्यमातून, म्हणजे ओव्हर-द-एअर (OTA) पद्धतीने पाठवता येतात. अशा अपडेट्सचे नियोजन, त्यांची पडताळणी आणि सुरक्षित अंमलबजावणी यासाठी ही व्यवस्था महत्त्वाची ठरते.
आजच्या कनेक्टेड कारमध्ये डिजिटल फीचर्स आणि सॉफ्टवेअरचा वापर वाढत असल्याने गाडीतील सिस्टीम सुरक्षित ठेवणे आणि अपडेट्स नीट पोहोचवणे गरजेचे झाले आहे. या प्रमाणपत्रांमुळे कंपनीच्या सायबर सुरक्षा आणि सॉफ्टवेअर अपडेट प्रक्रियांना संबंधित मानकांनुसार पडताळणी मिळाली आहे. त्यामुळे कनेक्टेड गाड्यांच्या सुरक्षिततेबाबत कस्टमर्सचा विश्वास वाढण्यास मदत होऊ शकते.
किया इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल सूद यांनी सांगितले की, गाड्या अधिक कनेक्टेड आणि सॉफ्टवेअरवर आधारित होत असताना ग्राहकांच्या डिजिटल अनुभवाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. गाडीच्या संपूर्ण आयुष्यभर सायबर सुरक्षा आणि अपडेट व्यवस्थापन मजबूत ठेवण्यावर कंपनीचा भर आहे.
पुढील काळात संभाव्य धोक्यांवर सतत लक्ष ठेवणे, कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता वाढवणे आणि अंतर्गत ऑडिट करणे अशा उपायांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे किया इंडियाने सांगितले आहे. त्यामुळे गाड्यांमधील कनेक्टेड फीचर्स अधिक सुरक्षित ठेवण्यास मदत होऊ शकते.
मात्र या प्रमाणपत्रांचा अर्थ प्रत्येक गाडी सायबर हल्ल्यांपासून पूर्णपणे सुरक्षित असल्याची हमी असा नाही. संबंधित सुरक्षा आणि अपडेट व्यवस्थापन प्रक्रियांचे मानकांनुसार मूल्यांकन झाले आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे.