इंडोनेशिया ते थायलंड... जगभरातील अनेक देशांत मोठ्या जल्लोषात सादर होते रामलीला
जावा आणि बालीपासून थायलंड, कंबोडिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो व गयानापर्यंत रामायणाची आणि रामलीलेची परंपरा वेगवेगळ्या रूपांत सादर होते.
शारदीय नवरात्रीत देशभरात रामलीला सादर केली जाते आणि दसऱ्याला रावणाच्या दहनाने तिची सांगता होते. भारताच्या अनेक भागांत रामलीलेचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्याला लोकांची मोठी गर्दी जमते. पण भारताबाहेरच्या अनेक देशांतही रामलीला सादर केली जाते आणि तिथे आनंदात उत्सव साजरा होतो, हे अनेकांना माहीत नसते. भारताव्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या देशांत रामलीला उत्सव साजरा केला जातो, त्याची माहिती पुढे दिली आहे.
इंडोनेशियात रामलीला आयोजित केली जाते, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. इंडोनेशिया हा मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. तरीही रामायण तिथल्या संस्कृतीत खोलवर रुजलेले आहे. तिथे भगवान राम कोणत्या एका धर्माचे नसून मानवी आदर्शांचे प्रतीक मानले जातात. जावा आणि बाली येथे रामायणावर आधारित नृत्य व नाट्यप्रयोग सादर केले जातात आणि रामलीला सुंदर नृत्य व नाटकाच्या रूपात दाखवली जाते.
थायलंडच्या संस्कृतीतही रामायणाचा खोलवर परिणाम दिसून येतो. तिथे रामायणाला रामकियन म्हणतात आणि ते त्या देशाचे राष्ट्रीय महाकाव्यही आहे. रामायणातील प्रसंग नृत्य आणि संगीताच्या तालावर अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले जातात. रामायण सादर करताना कलाकार एक विशेष मुखवटा घालतात, ज्याला खोन असे नाव आहे.
कंबोडियाचा इतिहास हिंदू संस्कृतीशी जोडलेला मानला जातो. तिथे रामायणाला रीमकेर म्हणतात आणि ही परंपरा तिथे प्रसिद्ध आहे. तिथल्या मंदिरांमध्ये आणि ऐतिहासिक ठिकाणी रामायणातील दृश्ये फार सुंदरपणे सादर केली जातात. कलाकार सुंदर पोशाख आणि दागिने घालून रामलीला सादर करतात.
त्रिनिदाद आणि टोबॅगो तसेच गयाना या देशांत भारतीय वंशाच्या समुदायांनी रामलीलेची परंपरा जपली आहे. इतिहासानुसार, १९ व्या शतकात ब्रिटिश राजवटीत भारतातून करारबद्ध मजुरांना ऊसाच्या शेतात काम करण्यासाठी या देशांमध्ये पाठवण्यात आले. ते मजूर आपली संस्कृतीही बरोबर घेऊन गेले. त्यांनी तिथे रामलीला सादर केली आणि तेव्हापासून ती तिथे लोकप्रिय झाली.
अशा प्रकारे इंडोनेशिया, थायलंड, कंबोडिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो तसेच गयाना या देशांमध्ये रामायणाची आणि रामलीलेची परंपरा वेगवेगळ्या नावांनी आणि रूपांनी आजही सादर होताना दिसते.