गुहागरच्या पालशेतमध्ये फिल्म टूरिझम प्रकल्पाचा प्रस्ताव महिन्याभरात द्या, शेलारांचे निर्देश
रत्नागिरी जिल्ह्यातील पालशेत येथील शासकीय जागेवर चित्रपट आणि पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव एमटीडीसीसोबत तयार करण्यास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात असलेल्या पालशेत येथे 'फिल्म टूरिझम' प्रकल्प उभारण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. शासकीय भूखंडावर चित्रपट आणि पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी हा प्रकल्प होणार असून, तो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) संयुक्त भागीदारीत उभारण्याचा विचार आहे.
मंत्री शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात यासंबंधी बैठक झाली. मौजे पालशेतसह आसपासच्या जागांचा वापर करून चित्रपट निर्मितीसाठी शासनामार्फत योजना तयार करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी कोकणात चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध सूचना मांडल्या.
पालशेत येथे पर्यटन विभागाची सुमारे १२५ एकर शासकीय जागा उपलब्ध आहे. या जागेवर पर्यटन आणि चित्रपट उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित कराव्यात, असे डॉ. नातू यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. शासनाने फिल्मसिटी उभारली तर या भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतरच ही बैठक आयोजित करण्यात आली.
गुहागर आणि दापोली तालुक्यांतील निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळे चित्रीकरणासाठी उपयुक्त आहेत, असे डॉ. नातू यांनी सांगितले. या परिसरात अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण झाले आहे. मात्र, चित्रीकरणासाठी लागणाऱ्या परवानग्या आणि सुविधा वेळेत मिळण्यात अडचणी येतात. सगळ्या सुविधा एकाच ठिकाणी मिळाल्या, तर चित्रपट निर्मितीला चालना मिळेल आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे डॉ. नातू म्हणाले.
पालशेतबरोबरच वेळणेश्वर आणि तवसाळ येथील शासकीय जागांचा उपयोग करून चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या सुविधा विकसित कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली. या जागांवर सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून सुविधा उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
मंत्री शेलार यांनी एमटीडीसीसोबत संयुक्त उपक्रमातून फिल्मसिटी उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्यास सांगितले. प्रकल्पासाठी निधी मिळवण्याचे वेगवेगळे पर्याय तपासून महिन्याभरात सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. चित्रपट पर्यटन योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून घेण्यासाठी म्हाडाची मदत घेण्याबाबतही विचार करावा, असे त्यांनी सांगितले.
डॉ. विनय नातू या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, एमटीडीसीचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.