गावी जाताना घराची काळजी कशाला? पाच स्मार्ट गॅझेट्स ठेवतील घरावर नजर
घर रिकामं ठेवून बाहेरगावी जायचं असेल, तर स्मार्ट कॅमेरे, डोअरबेल, सेंसर, लॉक आणि सेफ मदतीला येऊ शकतात.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अनेकदा असं होतं की आपण काही दिवसांसाठी बाहेरगावी जातो आणि घरात कोणीच नसतं. अशा वेळी मनात सतत घराचीच काळजी असते. आपल्या घराचं रक्षण कसं होईल, हा प्रश्न पुन्हा पुन्हा डोक्यात येतो. त्याचं उत्तर म्हणजे स्मार्ट सिक्योरिटी गॅझेट्स. ही गॅझेट्स घराची सुरक्षा करू शकतात आणि घरावर अगदी सहज नजर ठेवू शकतात.
मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. फक्त डिव्हाईस विकत घेतलं म्हणजे काम झालं असं नाही, तर ते योग्य पद्धतीने वापरणंही तितकंच गरजेचं आहे. घराच्या सुरक्षेसाठी कोणती गॅझेट्स उपयोगी पडू शकतात, ते आता बघूया.
सगळ्यात आधी स्मार्ट सिक्योरिटी कॅमेरे. घराचं मुख्य प्रवेशद्वार आणि तिथून येणारे-जाणारे इतर रस्ते यांच्यावर हे कॅमेरे नजर ठेवतात. ते इंटरनेटला जोडलेले असल्यामुळे त्यांचा लाईव्ह व्हिडीओ तुम्हाला स्मार्टफोनमध्ये सहज पाहता येतो. तुम्ही घरापासून कितीही लांब असलात, तरी घरावर लक्ष ठेवता येतं. बाजारात काही कॅमेरे असेही मिळतात ज्यांच्यात मोशन डिटेक्शनची सुविधा असते. थोडीशी हालचाल झाली की कॅमेरा चालू होऊ शकतो किंवा अलर्ट पाठवला जाऊ शकतो.
दुसरं म्हणजे स्मार्ट व्हिडीओ डोअरबेल. ती साध्या डोअरबेलपेक्षा खूपच ॲडव्हांस पद्धतीने काम करते. यात कॅमेरा, माइक्रोफोन आणि स्पीकर असतो. दारावर कोणी बेल वाजवली की त्या व्यक्तीचा फोटो किंवा लाईव्ह व्हिडीओ तुमच्या फोनवर दिसतो. टू-वे ऑडियोमुळे दाराबाहेरच्या माणसाशी बोलताही येतं. सामानाची डिलीव्हरी आली तर सूचना द्यायला किंवा कोणी अनोळखी माणूस आला तर त्याच्याशी बोलायला हे फीचर कामाचं ठरू शकतं.
तिसरं गॅझेट म्हणजे स्मार्ट मोशन सेंसर. आजूबाजूला काही हालचाल झाली तर तो ती ओळखतो आणि लगेच अलर्ट देतो. हे सेंसर स्मार्ट लाईटला जोडता येतात, मग हालचाल जाणवताच लाईट्स आपोआप लागतात. काही सेंसर माणसं आणि इतर ॲक्टिव्हिटी यांच्यातला फरक ओळखण्यासाठी बनवलेले असतात, त्यामुळे विनाकारण येणारे अलर्ट कमी होऊ शकतात.
चौथं म्हणजे स्मार्ट लॉक. स्मार्ट डोअर लॉकमध्ये पिन, फिंगरप्रिंट किंवा स्मार्टफोनने दरवाजा लॉक आणि अनलॉक करता येतो. काही डिव्हाईस लांबून कंट्रोल करता येतात, त्यामुळे दरवाजा लॉक आहे की नाही हे तपासणं सोपं जातं.
शेवटी स्मार्ट सेफ. घरातली महत्त्वाची डॉक्युमेंट्स आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवायला तो चांगला पर्याय ठरू शकतो. त्यात मॉर्डन लॉकिंग मॅकेनिज्म आणि इतर फीचर्सही मिळतात.