Asian Games 2026: फायनलमध्ये पराभव, पण इतिहासाच्या पानावर नाव! अनाहत सिंगने स्क्वॉशमध्ये जिंकलं ऐतिहासिक
जपानमधील आयची-नागोया इथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू अनाहत सिंग हिने स्क्वॉशच्या महिला एकेरी गटात रौप्यपदक जिंकलं. सुवर्णपदकाच्या लढतीत तिचा सामना मलेशियाच्या शिवसंगारी सुब्रमण्यम हिच्याशी झाला, आणि या सामन्यात अनाहतला ४-११, ४-११, ७-११ अशा तिन्ही सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला.
१८ वर्षांच्या अनाहतचं सुवर्णपदक या पराभवामुळे हुकलं. पण दुसरीकडे, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात स्क्वॉशच्या एकेरी प्रकारात रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनण्याचा मान तिने मिळवला. त्याआधी ती महिला एकेरी स्क्वॉशच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडूही ठरली होती. म्हणजेच अनाहतने या स्पर्धेत सुवर्णपदक जरी गमावलं असलं, तरी भारतीय स्क्वॉशच्या इतिहासात तिने दोन वेगळे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
अंतिम सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये शिवसंगारीने सुरुवातीलाच ६-३ अशी आघाडी घेत अनाहतवर दबाव टाकला. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत तिने रॅलीवर नियंत्रण मिळवलं आणि पहिला सेट ११-४ ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही अनाहत ६-२ ने पिछाडीवर गेली आणि शिवसंगारीने पुन्हा दमदार खेळ करत हा सेटही ११-४ ने खिशात घातला. तिसऱ्या सेटमध्ये अनाहतला मोठी आघाडी घेता आली नाही, ती सुरुवातीलाच ४-० ने मागे पडली. शिवसंगारीने चॅम्पियनसारखा खेळ करत तिसरा सेट ११-७ ने जिंकून सुवर्णपदकावर नाव कोरलं, तर अनाहतला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
या पराभवाचा एक मोठा परिणाम म्हणजे अनाहत सिंगने २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्याची संधी गमावली आहे. सुवर्णपदकाच्या सामन्यात विजय मिळाला असता, तर तिला ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळाली असती, पण या पराभवामुळे ती संधी हुकली आहे.
स्क्वॉशमध्ये आज सुवर्णपदकासाठी दोन सामने झाले आणि दोन्हीत भारताला रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं. अनाहतशिवाय पुरुष एकेरी स्क्वॉशमध्येही भारताच्या अभय सिंगला सुवर्णपदकाच्या लढतीत मलेशियाच्या युन यू एनजीकडून पराभव पत्करावा लागला. हा सामना ११-९, ११-५, ११-५ अशा तिन्ही सेटमध्ये एकतर्फी झाला. अभयलाही रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं, तरी त्याने एक वेगळा विक्रम केला. २०१४ आणि २०२३ मध्ये एकेरीत रौप्यपदक जिंकणाऱ्या सौरव घोषालनंतर या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरला. मात्र अंतिम सामन्यातल्या या पराभवामुळे अभयही लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र होऊ शकला नाही. अशा प्रकारे स्क्वॉशच्या दोन्ही एकेरी गटांत भारताला आज रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.