सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सचे नवे मुख्य प्रशिक्षक, आयपीएल २०२७ पूर्वी मोठा बदल
हेमांग बदानी यांच्या जागी सौरव गांगुली यांची दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
आयपीएल २०२७ च्या तयारीला सुरुवात झाली आहे आणि दिल्ली कॅपिटल्सने मुख्य प्रशिक्षकपदी सौरव गांगुली यांची नियुक्ती केली आहे. हेमांग बदानी यांच्या जागी गांगुली यांच्याकडे ही भूमिका सोपवण्यात आली आहे. आयपीएल २०२७ च्या आधी दिल्लीच्या संघासाठी हा मोठा बदल मानला जात आहे.
याआधी रिकी पाँटिंग यांच्यासारख्या दिग्गजांनी दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. तरीही दिल्लीच्या संघाला आतापर्यंत आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा अजूनही सुरू आहे.
नवी जबाबदारी स्वीकारताना गांगुली यांनी सांगितले की, ते एक निर्भय संघ तयार करण्याचा प्रयत्न करतील. भारताचे कर्णधारपद सांभाळताना गांगुली यांनी असाच निर्भय संघ उभा केला होता, ज्याने परदेशात विजयांची मालिका सुरू केली.
नव्या भूमिकेबद्दल उत्साही असलेले गांगुली म्हणाले, "मी आयपीएलमध्ये मुख्य प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारण्यास उत्सुक आहे. दिल्ली कॅपिटल्स ही एक अशी फ्रँचायझी आहे जी माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि जिच्याशी माझे अनेक वर्षांपासून घट्ट नाते आहे. मी मालक, व्यवस्थापन, सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंसोबत जवळून काम केले आहे, त्यामुळे ही माझ्यासाठी एक रोमांचक जबाबदारी आहे. आमच्याकडे एक प्रतिभावान गट आहे आणि आम्ही अलीकडे चांगला क्रिकेट खेळलो आहोत. मी संघासोबत, नवीन हंगामासाठी काम करण्यास आणि एक मजबूत व निर्भय संघ तयार करण्यास उत्सुक आहे."
आयपीएल २०२७ साठी सर्व फ्रँचायझींना १५ नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागणार आहे. त्याआधी अनेक संघांनी आपल्या कोचिंग स्टाफमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. चेन्नई सुपर किंग्स हा त्यातला एक प्रमुख संघ आहे, ज्याने झहीर खान यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
दिल्ली कॅपिटल्सने ही जबाबदारी गांगुली यांच्यावर सोपवली आहे. नवा संघ बांधण्यासाठी लागणारे बदल करायला गांगुली यांच्याकडे एक महिन्याचा कालावधी आहे. संघाचे कर्णधारपदही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऋषभ पंत हा अक्षर पटेल यांची जागा घेऊ शकतो.
ऋषभ पंतला ट्रेडद्वारे दिल्लीच्या संघात सामील करण्यात आले. फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आता लखनौच्या संघाचा भाग असेल. मात्र पंतचे शुल्क कमी करण्यात आले आहे. लखनौने त्याला २७ कोटी रुपयांना विकत घेतले, तर दिल्लीने त्याला ट्रान्सफर विंडोद्वारे १५ कोटी रुपयांच्या पगारावर संघात सामील करून घेतले. दिल्लीकडून खेळताना पंतने आयपीएलमध्ये आपली छाप पाडली आणि भारतीय संघात स्थान मिळवले. त्यानंतर त्याने कसोटी संघातही आपले स्थान पक्के केले.