सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 270 | Poor 17:47 IST

डोंबिवलीत २९ नोव्हेंबरला फ्रेंडशिप रनचे तिसरे पर्व, १० हजार धावपटूंचे लक्ष्य

आरोग्य, मैत्री आणि एकजुटीचा संदेश देणारी 'डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२६' २९ नोव्हेंबरला होणार असून नोंदणी ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू आहे.

डोंबिवलीत २९ नोव्हेंबरला फ्रेंडशिप रनचे तिसरे पर्व, १० हजार धावपटूंचे लक्ष्य छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

डोंबिवलीकरांनो, रनिंग शूज तयार ठेवा. 'डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२६' या स्पर्धेचे तिसरे पर्व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी डोंबिवलीत होणार आहे. आरोग्य, मैत्री आणि एकजुटीचा संदेश देणारी ही रन यंदा 'डोंबिवली शहराचा उत्सव' या संकल्पनेवर आधारित आहे आणि आयोजकांनी तयारी वेगाने सुरू केली आहे.

दुर्गाष्टमीचे औचित्य साधून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते 'नमो रमो नवरात्री'च्या प्रांगणात या उपक्रमाच्या थीम टी-शर्टचे आणि मेडलचे अनावरण झाले.

या रनचे आयोजन 'कल्याण डोंबिवली रनर्स' (KDR) करत आहे आणि 'डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार' यांचे सहकार्य त्यांना मिळाले आहे. शहरातील लोकांना एकत्र आणणे, राज्यातील धावपटूंना व्यासपीठ देणे आणि धावण्यातून आरोग्य, मैत्री व बंधुभावाची भावना वाढवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यंदाच्या संकल्पनेतून डोंबिवलीचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, कलेची आवड, क्रीडाप्रेम आणि आरोग्याबद्दलची जागरूकता दिसून येईल.

मागील दोन पर्वांना कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्रातून धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्या दोन्ही पर्वांत मिळून सुमारे ६ हजार धावपटू सहभागी झाले होते. यंदा हा आकडा १० हजारांपर्यंत नेण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे, असे कल्याण डोंबिवली रनर्सच्या वतीने रविंद्र सकपाळ यांनी सांगितले.

सुरज शेट्टी यांनी कल्याण डोंबिवली रनर्सच्या वतीने सांगितले की, सर्व वयोगटांतील व्यावसायिक धावपटूंबरोबरच फिटनेसची आवड असणारे लोक, कुटुंबे आणि मुले यांना सहभागी होता यावे, म्हणून एकूण पाच प्रकार ठेवले आहेत. २१.१ किमी, १० किमी आणि ५ किमी अशा तीन टाईम रन आहेत, तर ५ किमी आणि १.६ किमी अशा दोन फन रन आहेत. टाईम रनमधील विजेत्यांसाठी सुमारे ३ लाख रुपयांची पारितोषिके ठेवली आहेत.

८ ते १६ वयोगटातील मुलांसाठीची १.६ किलोमीटरची फन रन पूर्णपणे विनामूल्य आहे, असे रविंद्र सकपाळ यांनी सांगितले. लहानपणापासूनच मुलांना मैदानी खेळांची आणि व्यायामाची आवड लागावी, त्यांच्यात शिस्त, आत्मविश्वास आणि तंदुरुस्तीचे महत्त्व रुजावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त मुलांनी आणि कुटुंबांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. वयोगटानुसार पारितोषिकांची रक्कम आणि सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर व Instagram पेजवर दिली आहे.

या रनला ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनची मान्यता असणार आहे. नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाला ड्राय-फिट टी-शर्ट, फिनिशर मेडल, हायड्रेशनची सुविधा आणि अल्पोपहार मिळेल. टाईम रनमधील धावपटूंना टायमिंग चिप आणि क्वॉलिफिकेशन सर्टिफिकेटही मिळेल. सर्व सहभागींना पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मिळेल आणि त्यांचे फोटोही विनामूल्य दिले जातील, म्हणजे प्रत्येकाला आपल्या सहभागाच्या आणि यशाच्या आठवणी जपता येतील, असे सुरज शेट्टी यांनी सांगितले. धावपटूंना सुरक्षित आणि नियोजनबद्ध अनुभव मिळावा, म्हणून आयोजक विशेष काळजी घेणार आहेत. स्पर्धेचा मार्ग लवकरच जाहीर केला जाईल.

या रनमध्ये भाग घेण्यासाठी इच्छुकांना ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नोंदणी करावी लागेल. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील अनुभवी आणि नवे धावपटू, मुले, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन रविंद्र सकपाळ यांनी केले आहे. नोंदणी www.dombivlikarfriendshiprun.com या अधिकृत वेबसाइटवर करता येईल.

आमदार रविंद्र चव्हाण यांनीही नागरिकांना आवाहन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून शहरातील लोकांना एकत्र आणणारा उत्सव आहे. यंदाच्या पर्वात फिटनेस आणि मैत्रीबरोबरच डोंबिवलीच्या संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळेल. नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन धावपटूंचा उत्साह वाढवावा आणि डोंबिवलीच्या एकजुटीचा उत्सव साजरा करावा, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ